महत्प्रयासानं मिळवलेली आमदारकी वाचाळपणामुळं गमावण्याची नाचक्की..! अखेर आ. प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित!
मुंबई: सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं अखेर निलंबन झालं आहे. परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा, सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. आ.प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. परंतु वाचाळपणामुळे महत्प्रयत्नांनी त्यांनी मिळवलेली आमदारकी गमावण्याची नाचक्की त्यांच्यावर आज आली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी 9 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर अध्यक्ष असतील.
दरम्यान समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनापर्यंत मांडण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी केली आहे.
चौकशी समिती
अध्यक्ष – सभापती रामराजे निंबाळकर
सदस्य – चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनील तटकरे, जयंत पाटील,कपिल पाटील, शरद रणपीसे, आमदार नीलम गोऱ्हे
परिचारक यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्याबाबत आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदन दिलं.
“परिचारकांचं वक्तव्य निंदाजनक, संतापजनक आहे. असं वक्तव्य केल्यामुळे समाजातून संताप व्यक्त करण्यात येतोय. असं वक्तव्य विधानपरिषदेच्या सदस्याला न शोभणारं आहे. सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे वक्तव्य असल्यामुळे त्याची चौकशी करुन परिचारक यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहीजे. यासाठी समिती गठित करुन शिक्षेच्या पुढील शिफारशी करण्यात येतील.
1) विशेषाधिकार भंग,
2) कारावासाची शिक्षा,
3) निलंबन करणे
4) सदस्यत्व कायमचे रद्द करणे
चौकशी पूर्ण करून लवकरात- लवकर चौकशी अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
याशिवाय “परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सभापती रामराजे निंबाळकर हे या समितीचेअध्यक्ष असतील. तर या समितीमध्ये चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस आमदार नारायण राणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, ‘लोकभारती’चे आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे हे सदस्य असतील”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
पुढच्या दीड वर्षांसाठी प्रशांत परिचारक यांना निलंबित करण्यात आल्याचंही पाटील म्हणाले.
