मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची गारपीटीसह हजेरी…! शेतक-यांचे मोठे नुकसान!
सोलापूर जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, द्राक्ष बागांचं नुकसान
सोलापूर : मराठवाड्यासोबत सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पंढरपुरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या गावात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात गारपीट झाली.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुे द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे.
–——————————————————–
बार्शी तालुक्यातही अवकाळी पाऊस
बार्शी तालुक्यातील इंदापूरमधील शेतकरी शिवाजी घुगे यांची दीड एकर द्राक्ष बाग ऐन काढणीच्या वेळी वाऱ्याने जमीनदोस्त केली. या नुकसानीमुळे शिवाजी घुगे यांचं जवळपास 5 ते 6 लाखांचं नुकसान झालं आहे.
ऐन काढणीच्यावेळी झालेल्या या नुकसानाने घुगेंच्या तोंडचं पाणीच पळालं आहे. वर्षभर कष्ट करुन औषधे, फवारणी, मजुरी असा जवळपास 3 ते 4 लाखांचा खर्च त्यांनी केला होता. त्यामुळे त्वरीत पंचनामा करुन नुकसान भरपाईची मागणी शिवाजी घुगे यांनी केली आहे.
–——————————————————–
पंढरपूर तालुक्यात गारपीट…
सरकोली ,ओझेवाडी परिसरात गारांसह पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथेही गारपीट झाली.
–——————————————————–
मराठवाड्यात पाऊस…
मराठवाड्यातील आठपैकी बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. लातूरमध्ये दुपारपासून पावसाने थैमान घातल्यानंतर बीड, उस्मानाबाद आणि नांदेडमध्येही गारांसह पाऊस झाला.
गेल्या चार वर्षांपासूनच्या दुष्काळातून सावरत असलेल्या मराठवाड्याची चिंता पावसाने पुन्हा एकदा वाढली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या उमेदीने कामाला लागला होता. पण अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हाताशी आलेलं पीक गेलं आहे.
——————————————————–
उस्मानाबादलाही गारपीटीचा तडाखा, पिकांचं नुकसान
उस्मानाबाद : मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या मराठवाड्याला गारपीटीने पुन्हा एकदा अडचणीत आणलं आहे. अनेक ठिकाणी हाताशी आलेली पीकं गेली आहेत. लातूरमध्येही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे.
कळंबसह इतर परिसरातही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान उस्मानाबादमध्ये गारपीटीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेती, फळझाडे आणि फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
–——————————————————–
बीडमध्ये अवकाळी पावसाचा कहर, परळीत वीज पडून दोघांचा मृत्यू
बीड : लातूरनंतर अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याकडे कूच केली आहे. परळी तालुक्यातील कौठाळी शिवारात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जनावरं दगावल्याची घटना घडली आहे.
गटशेतीसाठी पुढाकार घेणारे परळी तालुक्यातील इंजेगावचे प्रयोगशील शेतकरी नाथराव कराड यांच्या शेडनेटं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेडनेटमधील मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे.
शिवाय लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनाही गारपीटीचा फटका बसला. जिल्ह्यातील अर्जुनेश्वर देवस्थान येथील जुनं चिंचेचं झाड कोसळल्याने गाड्यांचं नुकसान झालं.
लातूरमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. शिवाय उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. कारण हाताशी आलेलं पीक वाया जाण्याची चिन्हं आहेत. अनेक ठिकाणी गहू पिकाची काढणी झाली असल्याने त्याचं पावसाने मोठं नुकसान झालं आहे.
