![]()
13 चैत्र, 1938 (सायं. 5.15) दि. 3 ,एप्रिल 2017
मंत्रालयात अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओ…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन..मुंबई दि. 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “क्लॅप” देऊन आज माहिती व जनसंपर्क महासंचानलयाच्या अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओचे उदघाटन केले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या कार्यकक्षा उत्तमरीत्या विस्तारल्या असून स्टुडिओमुळे महाराष्ट्रातील जनतेशी थेट संवाद साधणे शक्य झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह, संचालक प्रशासन अजय अंबेकर,संचालक वृत्त देवेंद्र भुजबळ, संचालक माध्यम समन्वय शिवाजी मानकर यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अत्याधुनिक स्टुडिओची निर्मिती केली आहे. या स्टुडिओमुळे सर्व सामान्य जनतेला आपले प्रश्न शासनापुढे मांडण्यासाठी तसेच शासनाला आपले काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सशक्त असे दृकश्राव्य संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
नवीन स्टुडिओ मध्ये आत २४ व मंत्रालय गेटबाहेर १६ कनेक्टिव्हिटी पोर्टस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत.. त्यामुळे इतर वृत्त वाहिन्यांच्या ओबी व्हॅनसना इनपूट देणे शक्य होईल. जयमहाराष्ट्र – दिलखुलास हे महासंचालनालयाचे कार्यक्रम मंत्रालयातच ध्वनीचित्रमुद्रित करणे या स्टुडिओमुळे शक्य होणार आहे. स्टुडिओत क्रोमा, क्रु टेक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला आहे.
माहिती जनसंपर्ककडून नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी
आपल्या प्रास्ताविकात महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यावर्षी डिजिटल आणि व्हिज्युअल प्रसिद्धीवर लक्ष केंद्रित केले आहे. ट्व्टिर , फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक समाज माध्यमांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा कार्य विस्तार झाला आहे. आजमितीस महासंचालनालयाचे १०,५०० हून अधिक ट्व्टिर फॉलअर्स आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून सध्या २८ लाख लोकांना मोबाईल संदेशद्वारे शासनाचे निर्णय व बातम्या यांची माहिती पाठवली जाते. लवकरच हा डेटाबेस १ कोटी पर्यंत वाढवण्याचा महासंचालनालयाचा मानस आहे. मुंबईत डिजीटल होर्डिंग्ज, सुराज्य रथ यासारखे नवीन उपक्रम महासंचालनालय हाती घेणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपटाची निर्मिती यावर्षी पूर्ण करण्यात येईल. महासंचालनालयाने डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टिमही सुरु केली असल्याने विषयवार बातम्या आणि लेख यांचा संग्रह करणे, शोध घेणे आता शक्य होईल, असेही ते म्हणाले.
“मी मुख्यमंत्री बोलतोय” या कार्यक्रमातून जनतेशी साधल्या जाणाऱ्या संवादासाठी राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. केवळ चार दिवसात १८ हजार प्रश्न व्हॉटसॅपवर तसेच १२५० प्रश्न ईमेल वर प्राप्त झाले असल्याचेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना “मी मुख्यमंत्री बोलतोय” या कार्यक्रमाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौफेर कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी चित्रफीत ही दाखवण्यात आली.
००००
वृ.वि.5169 13 चैत्र, 1938 (दु. 4.20) दि. 3 ,एप्रिल 2017
प्रकल्पाच्या मान्यतेसाठी ‘डीजीसीए’ने प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पालघरमधील विमान निर्मिती प्रकल्पाला
राज्य शासन सहकार्य करणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : राज्यात पालघर येथे विमाननिर्मिती प्रकल्पासाठी राज्य शासन सर्व मदत करणार असून यासाठी राज्य शासन कॅप्टन अमोल यादव यांच्या कंपनीबरोबर सहकार्य करण्यास तयार आहे. या प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाने प्रक्रिया सुरू करावी. त्यासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
कॅप्टन अमोल यादव हे ट्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून पालघर येथे विमान निर्मिती प्रकल्प उभारणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मदत करावी, यासाठी त्यांनी आज या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमोर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कोकण विभागाचे आयुक्त पी.एन. देशमुख,सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक एसव्हीआर श्रीनिवासन, पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात 19 आसनी नागरी वाहतूक विमान निर्मिती करण्याचा श्री. यादव यांचा प्रकल्प आहे. यामुळे अंतर्गत विमान वाहतूक सुलभ होणार आहे. तसेच हा प्रकल्प राज्य शासनाच्या औद्योगिक विकास महामंडळाबरोबर संयुक्त भागीदारीतून करण्यात यावा,असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले की, श्री. यादव यांनी स्थानिक पातळीवर विमानाची निर्मिती करण्याचे संशोधन यशस्वी केले आहे. त्या आधारावर तसेच देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्यामुळे प्रकल्पाच्या प्रमाणीकरणासाठीची कार्यपद्धती नागरी वाहतूक महासंचालनालयाने तयार करून या प्रकल्पास मंजुरी द्यावी. यासाठी पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात येईल. या प्रकल्पासाठी जमिन देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. यादव यांनी विमान निर्मितीची प्रक्रिया व या प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले की, प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेले विमानाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता 19 आसनी विमान बनविण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने जमीन व इतर बाबींसाठी मदत करावी. लहान आकाराच्या विमानामुळे राज्यातील 30 विमानतळांदरम्यान वाहतूक सुरू करता येईल. यासाठी सध्या असलेल्या कुठल्याही विमानतळावर अतिरिक्त पायाभूत सुविधांची गरज भासणार नाही.
०००
नंदकुमार वाघमारे/डीएलओ/3.4.2017
वृ.वि.5170 13 चैत्र, 1938 (दु. 4.20) दि. 3 ,एप्रिल 2017
वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथील शेतकऱ्यांची
कापूस विक्रीची थकित रक्कम तातडीने द्यावी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उप बाजारपेठ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीची थकित रक्कम येत्या दहा दिवसांत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
सिंदी बाजार समितीच्या उप बाजारपेठेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या देय रकमेबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार पंकज भोयर, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा,जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सेलू कार्यक्षेत्रातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली होती. तथापि, खरेदी केलेल्या कापसाची रक्कम दिली नव्हती. या शेतकऱ्यांच्या थकित रक्कम देण्यासंबंधी आज या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीची रक्कम त्यांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी वित्त विभाग व पणन विभागाने तातडीने मार्ग काढावा. तसेच एकूण किती रक्कम देय आहे,याची छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा.
०००
नंदकुमार वाघमारे/डीएलओ/3.4.2017
वृ.वि.5171 13 चैत्र, 1938 (दु. 3.00) दि. 3 ,एप्रिल 2017
‘दिलखुलास’ मध्ये गायिका गीता माळी यांची मुलाखत
मुंबई, दि. 3 : ‘गायन माझी साधना’या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’कार्यक्रमात नाशिक येथील गायिका गीता माळी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.
ही विशेष मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दिनांक 4 आणि 5 एप्रिल 2017 रोजी मंगळवार आणि बुधवार या दिवशी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत हेमंत बर्वे यांनी घेतली आहे.या मुलाखतीत गायन क्षेत्रातील प्रवास,आतापर्यंत केलेले विविध कार्यक्रम,अनुभव आणि या क्षेत्रातील करिअर आदींबाबत श्रीमती माळी यांनी माहिती दिली आहे.
००००
