कोल्हापूर फिरत्या खंडपीठासाठी राज्य शासन सकारात्मक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर फिरत्या खंडपीठासाठी

राज्य शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 5 : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) व्हावे यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

            कोल्हापूर येथे मा. उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर येथील शिष्टमंडळ आणि खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन येथे भेट घेतली. यावेळी महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील,खासदार संभाजी शाहू छत्रपती, छत्रपती शाहू महाराज, आमदार सर्वश्री अमल महाडिक,चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, सतेज (बंटी) पाटील, कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, बाबा देसाई, संदिप देसाई, आर. के. पोवार, बाबा पार्टे, बार कौन्सिलचे अध्यक्ष प्रकाश मोरे, ॲड. माधवराव अडगुळे,समीउल्ला पाटील, रणजीत गावडे, सर्जेराव खोत, बी. के. देसाई, मनोज पाटील, अजित मोहिते, शिवाजी राणे, विवेक घाडगे, विनय कदम आदी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मा. उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ (सर्किट बेंच) व्हावे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यासाठी राज्य शासनाने मंत्रीमंडळात ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला आहे. मा. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी सांगितल्यास ठरावातील अस्पष्टता दूर करून वेगळा ठराव करून पाठविण्यात येईल. तसेच खंडपीठाच्या निर्मितीसाठी मा. उच्च न्यायालयास लवकरच पत्र पाठविणार आहे.

            खंडपीठाविषयी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून या प्रश्नी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेण्यासाठी शिष्टमंडळाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन साखळी उपोषण मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ प्रयत्नशील राहील, असे आश्वासन शिष्टमंडळाने यावेळी दिले.

००००

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *