पंढरपूर Live दि.29 एप्रिल 2017
पंढरपूर, दि. 28 :–शासन जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना व विकास कामे राबवित असून त्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले.
पंढरपूर तालुका पंचायत समितीची आमसभा आमदार बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंगल कार्यालय, पंढरपूर येथे संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, पंचायत समितीचे सभापती दिनकर नाईकनवरे, तहसिलदार अनिल कारंडे, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, पंचायत समितीचे पदाधिकारी , अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार बबनराव शिंदे म्हणाले अधिका-यांनी जनतेची कामे वेळेत पुर्ण करावीत तसेच नागरीकांनी उपस्थित केलेल्या समस्यांची दखल घेवून योग्य त्या उपाय योजना कराव्यात. तसेच शासनामार्फत सुरु असलेल्या विकास कामांवर पदाधिका-यांनी लक्ष ठेवावे व जिथे त्रुटी असतील त्यांची माहिती प्रशासनाला द्यावी. तसेच कृषी विभागाने लाभार्थी शेतक-यांना अनुदानाचे वाटप तात्काळ करावे अशा सुचनाही आमदार शिंदे यांनी यावेळी दिल्या.
आमदार गणपराव देशमुख म्हणाले की, नागरीकांना शासनाच्या सेवा सुविधा मिळाव्यात त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी. या आमसभेत नागरीकांनी मांडलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने कार्यवाही करावी तसेच पाणी ही जनतेची संपत्ती असून, पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करुन सर्वांना समान पाणी वाटप करावे अशा सुचनाही आमदार देशमुख यांनी दिल्या..
महसूल विभागाने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. वीज वितरण कंपनीने तालुक्यात नागरीकांच्या वीजेच्या मागणीनुसार वीज पुरवठा करावा. पाटबंधारे विभागाने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचेही नियोजन करण्याबातच्या सुचना आमदार भारत भालके यांनी यावेळी आमसभेत दिल्या.
यावेळी आमसभेत कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महसूल, महावितरण आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.


