👁 8 Views

मराठवाड्याची रेल्वे रुळावर येईल?

मराठवाड्यातील एकेरी मार्गावर क्षमतेच्या दुप्पट गाड्या धावतात, परंतु या मार्गांचे दुहेरीकरण दूरवर, नव्या मार्गांच्या सर्वेक्षणाला तरतूद नाही़ साचेबद्ध बैठका होतात़ प्रत्येकवर्षी केलेल्या मागण्यांचे पुढे काय होते, याचा पत्ता लागत नाही़ याउलट महानगरांना जोडणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक खाजगी बसेसच्या सोयीचे कसे होते हे न उलगडणारे कोडे आहे़

रेल्वेचा नांदेड विभाग मुंबईस्थित मध्य रेल्वेला जोडा ही मागणी प्रदीर्घ प्रलंबित आहे़ परभणी-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी २०१८ अखेरची वाट पहावी लागणार आहे़ नवीन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण अधांतरी आहे़ अशावेळी मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांतील खासदारांची होणारी बैठकही औपचारिकता ठरत असेल तर मराठवाड्याची रेल्वे रुळावर कधी येईल हा सतावणारा प्रश्न आहे़

रेल्वेच्या नांदेड विभागात औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आदी जिल्हे येतात़ या जिल्ह्यांतील खासदारांसमवेत रेल्वेचे महाव्यवस्थापक वर्षातून एकदा बैठक घेतात़ ती गेल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे झाली़ चर्चाचर्वन, मागण्यांचे निवेदन आणि शेवटी आश्वासनांवर सर्वजण आश्वस्त होऊन बैठक संपली़ रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीला कायम बगल दिल्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राच्या बाहेर आहे़ वर्षानुवर्षे मागणी केली जाते, त्यावर साधा शब्दही महाव्यवस्थापक काढत नाहीत़ बहुतांश राज्यातील विभाग त्या-त्या राज्यातील जिल्ह्यांचे मिळून बनले आहेत़ मात्र मराठवाडा हा सिकंदराबादस्थित कार्यालयाशी जोडला गेला आहे़ त्यातही नांदेड जिल्ह्यातील उमरी, धर्माबाद हे दोन रेल्वेस्टेशन नांदेड विभागात येत नाहीत़ त्यांचा कारभार सिकंदराबादहून चालतो़ प्रशासकीय अडथळ्यांमुळे रेल्वे सेवेवर मर्यादा येतात़ मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक, डब्ब्यांची अवस्था यावर खासदारांनी कितीही बोलले, आमदारांनी आंदोलने केली तरी परिस्थिती सुधारत नाही़

सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे नांदेड येथून पुणे, मुंबई व नागपूरकडे धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक खासगी बस मालकांच्या शिफारशीवर बनते की काय? अशी शंका घेतली जाते़ महाव्यवस्थापकांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण, खा़ राजीव सातव, खा़ बंडू जाधव यांनी वेळापत्रकाच्या गडबडीचा मुद्दा मांडला़ खा़चव्हाण यांनी तर वेळापत्रक बनविण्यामागे रेल्वे अधिकारी व खासगी बस मालकांचे हितसंबंध गुंतले आहेत, त्याची सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली़ त्यावरही महाव्यवस्थापक मूग गिळून गप्प राहिले़ पुढच्या काही दिवसांत परिस्थिती नाही सुधारली तर सर्व खासदार एकत्रितपणे रेल्वेमंत्र्यांकडे जातील वा सभागृहात सीबीआय चौकशीची मागणी लावून धरतील असे अपेक्षित आहे़

परभणी-मुदखेड या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम परभणी ते मिरखेलपर्यंत या महिनाअखेर पूर्ण होईल़ त्यानंतर डिसेंबर २०१८ पर्यंत मुदखेडपर्यंतचा टप्पा पूर्ण होईल़ शिवाय परभणी ते मनमाडपर्यंतच्या दुहेरीकरणाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे़ आगामी अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकेल असा आशावाद महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला, ही समाधानाची बाब आहे़ मुळातच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्या केवळ सिकंदराबादस्थित दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडे नसून मुंबईच्या मध्य विभागाचाही संबंध येतो़ त्यामुळे अनेक मागण्यांबाबत टोलवाटोलवी होते़ परिणामी दक्षिण मध्य रेल्वे तसेच मध्य रेल्वे या दोन्हीही विभागांच्या महाव्यवस्थापकांची संयुक्त बैठक महिनाभरात होणार असल्याचे आश्वासन मिळाले आहे़ त्याची पूर्तता झाली तर रेल्वे प्रवासी उत्तम सेवेने धन्य होतील़

बोधन-बिलोली-मुखेड-लातूर व नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर या दोन नव्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण, नांदेड-वर्धा-यवतमाळ या मार्गासाठी अधिकचा निधी तसेच प्रवाशांच्या सोयीचे वेळापत्रक हे कळीचे मुद्दे केवळ चर्चेत राहू नयेत़ त्यासाठी खासदारांची एकजूट व्हावी, परंतु तिथेही निमंत्रित अकरांपैकी तिघेच बैठकीला उपस्थित राहणार असतील तर रेल्वेची अवजड सेवा प्रवाशांसाठी सुलभ कशी होईल?

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *