सोशल मीडियावर अनेकांनी या नव्या घोषणेचे स्वागत केले
‘अब की बार मोदी सरकार’ हे वाक्य आठवतंय का?, हेच वाक्य तीन वर्षांपूर्वी देशातील प्रत्येक घरामध्ये ऐकायला येत होते. याच वाक्यामुळे आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रचारामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आले. या सत्ताग्रहणाला आज, शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांतील विविध कामांची ग्राफिक्सद्वारे माहिती देणारे एक ट्विट नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी केले. त्यासोबत त्यांनी एक नवी घोषणाही दिली आहे. ‘साथ है, विश्वास है…हो रहा विकास है!’ अशी ही नवी घोषणा आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या नव्या घोषणेचे स्वागत केले आहे.
गेल्या तीन वर्षांत आपल्या सरकारने ठोस पावले उचलल्यामुळे लोकांचे जीवन बदलले असल्याचे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गरिबांच्या कल्याणास आणि सुशासनास समर्पित असलेल्या मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचे अभिनंदन असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील सर्वाधिक लांबीच्या पुलाचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. या पुलामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण तटावरील धोला आणि उत्तर तटावरील सादिया हे दोन भाग जोडले जाणार आहेत. एकूण नऊ किलोमीटरहून अधिक लांबीचा असलेला हा पूल देशातील सर्वाधिक लांबीचा पूल ठरला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये शून्य रुपयात खाते उघडून संपूर्ण देशाला बँक छत्राखाली आणणारी ‘जन धन योजना’ त्यांनी सुरू केली. पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींना चाप बसविण्यासाठी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला. काळे धन, भ्रष्टाचार यांना रोखण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ढवळून निघाली होती.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





