👁 10 Views

पनवेल भाजपकडे, शिवसेनेला भोपळा

एमआयएमला मुस्लिमांनी नाकारले
भिवंडी — निजामपूर आणि मालेगाव या मुस्लिमबहुल महापालिकांमध्ये एमआयएमने निवडणूक लढविली होती. या दोन्ही महापालिकांमध्ये एमआयएमला यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुस्लिम मतदारांनी एमआयएमला नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसचा रस्ता धरल्याचे स्पष्ट झाले आहे.


मुंबई : विशेष प्रतिनिधी 
महापालिका निवडणुकीत पनवेलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत अन्य महापालिकांमध्येही ताकद वाढविली आहे. काँग्रेसनेही भिवंडी — निजामपूर महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवित आणि मालेगाव महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवित चांगली कामगिरी केली. शिवसेनेला मात्र पनवेल आणि भिवंडीत अपयशाचा सामना करावा लागला असून पनवेलमध्ये तर शिवसेनेला साधे खातेही उघडता आले नाही. पनवेल आणि भिवंडीत सत्तेचे चित्र स्पष्ट झाले असले तरी मालेगाव महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने तेथे कोणती सत्ता समीकरणे जुळून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
राज्यात पहिल्या टप्प्यात दहा महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात पनवेल, भिवंडी — निजामपूर आणि मालेगाव या तीन महापालिकांच्या निवडणुका 24 मे रोजी पार पडल्या होत्या. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पनवेल महापालिकेवर पहिला महापौर कोणाचा बसणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर या पिता-पुत्रांनी शेकापला धूळ चारीत सत्ता हस्तगत केली. 78 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 51 जागा जिंकत मुसंडी मारली. शेतकरी कामगार पक्षाला 23 जागांवर समाधान मानावे लागले. 
शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि आदेश बांदेकर यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे तेथील खाते बंद झाले. शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी — काँग्रेसला प्रत्येकी फक्‍त 2 जागा जिंकता आल्या. 
भिवंडी महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. 90 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले. भाजपचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. भाजपने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम उमेदवारही दिले होते. मात्र, भाजपला 19 जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपची गेल्या निवडणुकीपेक्षा ताकद वाढली असली तरी कोणार्क आघाडीशी युती करीत सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न मात्र धुळीस मिळाले. गेल्या निवडणुकीत 16 जागा जिंकणार्‍या शिवसेनेच्या यावेळी 4 जागा घटल्या. 
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न देण्याचा परंपरा मालेगावकर मतदारांनी यंदाही कायम ठेवली आहे. मालेगाव महापालिकेच्या 21 प्रभागांतील 84 जागांसाठी झालेल्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमताचा जादुई 42 चा आकडा गाठता आलेला नाही. निवडणुकीच्या प्रारंभापासून काँग्रेसने प्रचारात आघाडीत घेत महापौरपदासाठी माजी आमदार शेख रशीद यांचे नाव जाहीर करीत व्यक्‍तिकेंद्री लढत घडविली. या रणनीतीतून काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा मिळवल्या, तर  जनता दलाचे दिवंगत नेते साथी निहाल अहमद यांचे पुत्र नगरसेवक बुलंद इक्बाल यांनी माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या महाआघाडीने 26 जागा पटकावल्या. राष्ट्रवादी 20, तर जनता दल 6 जागांवर विजयी झाले. त्यामुळे सत्तेची गणीते राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडीचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने त्यास होकार दिला तर मालेगावर या दोन मित्रपक्षांची सत्ता येणार आहे. 
एकूण 152 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 79 जागा जिंकल्या. काँग्रेसने 77, राष्ट्रवादीने 22, शिवसेनेने 25 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपला समाधानकारक यश मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात 10 महापालिकांमध्ये सपाटून मार खाणार्‍या काँग्रेसला या निवडणुकीने दिलासा दिला आहे. 
एमआयएमला मुस्लिमांनी नाकारले
भिवंडी — निजामपूर आणि मालेगाव या मुस्लिमबहुल महापालिकांमध्ये एमआयएमने निवडणूक लढविली होती. या दोन्ही महापालिकांमध्ये एमआयएमला यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुस्लिम मतदारांनी एमआयएमला नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसचा रस्ता धरल्याचे स्पष्ट झाले आहे. भिवंडीत एमआयएमला एकही जागा मिळाली नाही. मालेगावमध्ये केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले. मालेगाव महापालिकेवर निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी सत्ता राखणार्‍या जनता दलाला (सेक्युलर) देखील मुस्लिम मतदारांनी नाकारले. जनता दलाला केवळ 6 जागा जिंकत्या आल्या. समाजवादी पक्षालाही मुस्लिम मतदारांचा पाठींबा मिळाला नाही. भिवंडीत सपाने फक्त 2 जागा जिंकल्या. मुस्लिम मतदारांनी मतविभाजन टाळून काँग्रेसला या दोन्ही ठीकाणी मतदान केल्याचे या निकालांनी स्पष्ट झाले.














सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *