वेगवेगळ्या तिघांना तब्बल 1 कोटी 31 लाख 7 हजार रुपयांचा चुना लावणार्या बिल्डर प्रफुल्ल मधुकरराव मांडे याच्याविरुद्ध सातारा, क्रांती चौक आणि सिटी चौक ठाण्यांमध्ये तीन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यात मोफा कायद्यानुसारही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी चौकशी केल्यानंतर शुक्रवारी ही कार्यवाही करण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, हवालदार विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, भागवत सुरवाडे, गणेश शिंदे, कारभारी गाडेकर, महेश उगले, मनोज उईके, सुनील फेपाळे, सचिन संपाळ, दादासाहेब झारगड यांनी केली.
प्रकरण क्र. एक : फ्लॅटची परस्पर विक्री
अक्षय माधवराव दमकोंडवार (रा. ज्ञानेश्वरनगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, प्रथमेश कन्स्ट्रक्शनचा मालक प्रफुल्ल मांडे याने सुंदरवाडी येथील गट क्र. 31 मध्ये बांधलेल्या अपार्टमेंटमधील सात फ्लॅट इतरांना विक्री केले. मुळात ते अक्षय दमकोंडवार यांच्या हिश्श्याचे होते. तसेच त्या सात फ्लॅटमधील तीन फ्लॅट आणखी तिसर्या व्यक्तींना विक्री केले. हा सर्व व्यवहार बनावट कागदपत्रं तयार करून 70 लाख 7 हजार रुपयांत झाला. या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकरण क्र. दोन : केवळ पैसे घेतले, फ्लॅट दिलाच नाही
दीपक इंद्रराव पवार (रा. समर्थनगर) यांनी तक्रारीत म्हटले की, प्रफुल्ल मांडे याने समर्थनगर येथील तळमजल्यावरील फ्लॅट 61 लाख रुपयांत देतो म्हणून 9 एप्रिल 2012 रोजी इसार पावती केली. त्याबदल्यात 40 लाख रुपये घेतले. उर्वरित रक्कम खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले. त्यानंतर याच भागात दुसर्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट देतो म्हणून 10 डिसेंबर 2012 रोजी पवार यांच्याकडून पुन्हा 10 लाख रुपये घेतले. तो फ्लॅट 73 लाखांत विक्रीचा करारनामा केला. त्यानंतर या दोन्ही फ्लॅटची विक्री रद्द करून पन्नालालनगर येथे फ्लॅट देतो म्हणून करारनामा केला. विशेष म्हणजे तिन्ही ठिकाणांपैकी एकही फ्लॅट न देता पवार यांची तब्बल 50 लाख रुपयांना फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकरण क्र. तीन : पैसे एकाचे फ्लॅट दुसर्याला विकला
कुलदीपसिंग ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांना प्रफुल्ल मांडे याने सुंदरवाडी येथे फ्लॅट देतो म्हणून 11 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅटचे खरेदीखत त्यांना न करून देता सदरचा फ्लॅट दुसर्याच व्यक्तीला विक्री केला. यात ठाकूर यांची 11 लाख रुपयांना फसवणूक झाली. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकाच घरावर दोनवेळा कर्ज
रमेश कचरू सुरडकर (रा. सातारा) यांनी राधाकृष्ण भाऊराव खरात याच्याकडून सातारा परिसरमध्ये ड्युप्लेक्स घर 6 लाख 20 हजार रुपयांत घेतले होते. त्यावर सुरडकर यांनी आयसीआयसीआय बँकेचे कर्ज घेऊन घर खरेदी केले. मात्र, त्यानंतर खरात याने हेच घर बाबासाहेब शिंदे यांना 6 लाख 71 हजार रुपयांत विक्री करण्याचा करारनामा करून दिला व आयसीआयसीआय बँकेचे 5 लाख 70 हजार रुपये कर्ज घेतले. आरोपी खरात व शिंदे यांनी संगणमत करून बँकेच्या अधिकार्यांना हाताशी धरून एकाच घरावर दोन वेळा कर्ज घेतले व सुरडकर यांची फसवणूक केली. या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी राधाकृष्ण खरात अटकेत आहे.





