प्रसंग एक.
शाळेला जात होतो तेव्हाची गोष्ट.
एक दिवस मित्राच्या घरी गेलो होतो. पावसाची रिपरिप चालू होती. सगळीकडे चिखल झालेला. …आणि त्या चिखलात मित्राचे ऐंशी नव्वद वर्षांचे आजोबा डोक्यावर पोत्याची घुंची घालून खड्डा खणत असलेले.
“आजोबा, एवढया पावसात हे काय करताय?” मी विचारलं.
“आंब्याचं झाड लावणार आहे, त्यासाठी खड्डा काढतोय.”
“या झाडाला आंबे किती वर्षांनी लागणार?”
“पंधरा वीस वर्षांनी लागतील की !”
“पण त्यावेळी तुम्ही असणार का आंबे खायला?” मी विचारलं.
“मी कुठला असतोय?…..आणखी चारपाच वर्षं जगलो तरी लै झालं!”
“तुम्हाला आंबे खायला मिळणार नसतील तर हे झाड लावतायच कशाला तुम्ही?”
“अरे!…मला आंबे मिळाले नाहीत तरी माझी पोरंबाळं खातीलच की ! नाहीतर त्यांची पोरंबाळं खातील. त्यांनीही नाही खाल्ली तरी वाटेचे वाटसरू तरी खातील !”
प्रसंग दोन.
परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या कंपाऊंडच्या आत एक आंब्याचं झाड होतं. त्याच्या निम्म्या फांद्या त्याच्या हद्दीत होत्या , काही फांद्या रस्त्यावर गेल्या होत्या. झाड आंब्यांनी लगडलेलं होतं.
“अरे वा !…..आंबे मस्तच लागलेत की!…..कुठल्या जातीचा आंबा आहे हा?” मी म्हटलं.
“माहित नाही !….पडका उगवलाय……पण चवीला एकदम मस्त आहे!” मित्र बोलला. मग आठवल्यासारखं करून बोलला,”ए, तुझ्याकडे कुऱ्हाड आहे का रे?”
“आहे की !…..का रे?” मी विचारलं.
“मला या झाडाच्या कंपाऊंडबाहेर गेलेल्या फांद्या तोडायच्या आहेत.”
“का रे?”
“कंपाऊंडच्या बाहेरचे आंबे आमच्या हाताला लागतच नाहीत. रस्त्यांनी जाणारी मुलं माणसंच ते तोडून नेतात.”
“मग ठीक आहे ना !….तुझ्या हद्दीतले आंबे तुला मिळतात ना !…झालं तर !…..बाहेरचे आंबे लोकांनी नेले तर तुझं काय नुकसान होणार आहे?’
“पण ते झाड माझ्या हद्दीत उगवलंय तेव्हा सगळे आंबे मलाच मिळायला हवेत….आणि मला मिळणार नसतील तर ते इतर कुणालाच मिळता कामा नयेत.”
“तेवढ्यासाठी तू झाडाच्या फांद्या तोडणार?”
“मग काय तर?….तोडणार म्हणजे तोडणार.”
“पण मग त्या फांद्या तोडल्यावर तुला काय फायदा मिळणार आहे?” मी विचारलं.
“मला फायदा मिळणार नाही पण तो इतरही कोणाला मिळणार नाही….माझ्या हद्दीतल्या झाडाची फळं एकतर मला मिळावीत किंवा कुणालाच मिळू नयेत !”
………दोन्ही माणसंच ! एक अशिक्षित आणि एक सुशिक्षित !…..पण विचारसरणीत किती फरक आहे नाही?






