मुंबई, दि. 31 : गोराई येथील डंपिंग ग्राऊंड शेजारील कचऱ्यांच्या गाड्यांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. स्थानिकांच्या समस्या जाणून तातडीने कचरागाड्या व कचऱ्याची विगतवारी कायमस्वरुपी बंद करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.
मंत्रालयात गोराई येथील डंपिंग ग्राऊंड संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. कदम बोलत होते. या बैठकीस प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी.एन. अनबलगन, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, कचरा व्यवस्थापनचे मुख्य अभियंता श्री.अन्सारी यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले की, गोराई 3 येथील डंपिंग ग्राऊंड शेजारी कचऱ्यांच्या गाड्यांचे वाहनतळ असलेल्या ठिकाणी ओला व सुखा कचरा वेगवेगळा करण्यात येतो. या विगतवारीच्या प्रक्रीयेमुळे परिसरात दुर्गंधी पसरुन स्थानिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. स्थानिकांच्या आरोग्याला महत्व देऊन सदर कचरागाड्या व कचऱ्याची होणारी विगतवारी कायमस्वरुपी बंद करावी, असे निर्देश श्री. कदम यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.





