👁 9 Views

पंढरपूरमध्ये सलग दुसर्‍या दिवशी पावसाची हजेरी… शहरातील शिवाजी चौक व प्रदक्षिणा मार्गावर साठुन राहणार्‍या पावसाच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर! शहरातील विद्युत पुरवठा वारंवार होतोय खंडीत..! नागरिक त्रस्त!!

पंढरपूर लाईव्ह (विशेष प्रतिनिधी) दि. 4 जुन 2017

शहरातील शिवाजी चौक व प्रदक्षिणा मार्गावर साठुन राहणार्‍या पावसाच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर!

भुवैकुंठ पंढरी नगरीत कालपासुन वरुणराजाने हजेरी लावली असून शहरासह तालुक्याला दोन दिवस पावसाने झोडपले. शहरातील शिवाजी चौक, प्रदक्षिणा मार्गावरील चौफाळा ते कालिका देवी चौक या मार्गावर गुडघ्याएवढे पाणी साठले आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील पाण्याखाली गेलेल्या खड्ड्यांचा अंदाज भाविकांना व नागरिकांना न आल्याने दुचाकीस्वार व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. आषाढी यात्रा तोंडावर  येऊन ठेपली आहे. पावसाळा सुरु झाला आहे. परंतु शिवाजी चौक व प्रदक्षिणा मार्गावर साठणार्‍या या पावसाच्या पाण्याबाबत कोणतीही उपाययोजना नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून अद्याप करण्यात आली नसल्याचे दिसत आहे. पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी सखल भागात पाणी साठुन राहिले आहे. कांही ठिकाणी ड्रेनेज व गटारी तुंबल्या आहेत. यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव व दुर्गधी पसरलेली आहे. त्यामुळे ऐन यात्रेच्या तोंडावर शहरात रोगराई पसरण्याची भीती आहे.  नगरपालिका प्रशासनाने त्वरीत याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे. 

शहरातील विद्युत पुरवठा वारंवार होतोय खंडीत..! नागरिक त्रस्त!!

आज पंढरीत वादळ वारे व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. काल रात्री वादळ वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शहरातील कांही रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रहदारीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता. पावसाळामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. रात्री उशीरा विद्युत पुरवठा सुरळीत झाला. अनेक घरांवरचे पत्रे वार्‍याने उडाले. त्यातच वीजपुरवठा खंडीत झाल्याने अंधारात नागरिकांचे हाल झाले. पुन्हा आज दुपारी पाऊस सुरु झाल्यानंतर विद्युत पुरवठा कांही काळ खंडीत झाला होता. विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होऊ नये यासाठी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी त्वरीत याकडे लक्ष घालुन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी जनतेतून होत होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *