👁 10 Views

डाव्यांची एकपक्षीय हुकूमशाही नेपाळींना अमान्य

-जनरल कटवाल यांचे स्पष्ट प्रतिपादन
-भारतीय विचार मंचातर्फे भारत-नेपाळ संबंधावर चर्चा
नागपूर, ९ जून
नेपाळ हिंदू राष्ट्र होते व ते नेपाळी नागरिकांनी नाकारले नाही आणि धर्मनिरपेक्ष राज्याची मागणी देखील कुणी केली नव्हती. त्यामुळे डाव्यांची विद्यमान एकपक्षीय हुकूमशाही नेपाळींना अमान्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन नेपाळचे निवृत्त सेनाध्यक्ष रुक्मांगद कटवाल यांनी केले.
भारतीय विचार मंचातर्फे आज सायंकाळी स्थानिक चिटणवीस सेंटर सभागृहात वर्तमान परिदृष्यातील भारत-नेपाळ संबंध व भविष्य या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय विचार मंचाचे महानगर संयोजक उमेश अंधारे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रुक्मांगद कटवाल यांनी, माझा जन्म पूर्व नेपाळमधील मागास भागात झाला. मी नेता नाही आणि सनदी अधिकारी नाही आणि या विषयावरील तज्ज्ञ देखील नाही. मागील ८ वर्षांपासून निवृत्त जीवन जगत आहे. मात्र नेपाळचा एक सैनिक म्हणून मी नेहमी नेपाळच्या हिताचा विचार करतो. जगात कुणालाही शेजारी निवडीचे स्वातंत्र्य नसते. निसर्गाने भारत व नेपाळला एकत्र बांधले आहे. त्यातच संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा, रूढी यामध्ये देखील समानता आहे. नेपाळच्या तुलनेत भारत समृद्ध, भौगोलिकदृष्ट्या विशाल, सर्वात मोठी लोकशाही व गतिशील अर्थव्यवस्था असलेला देश आहे. आर्थिक महासत्तेकडे वाटचाल देखील करीत आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताने शेजारी राष्ट्रांकडे त्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. भविष्यात दोन्ही देशांच्या शीर्षस्थ नेत्यांनी चर्चेतून परस्परांमधील समस्या सोडवाव्या, असे आवाहनही कटवाल यांनी केले.
नेपाळमधील सरकार अस्थिर आहे. वारंवार सरकार बदलते आणि धोरण देखील त्यानुसार बदलते. त्यामुळे नेपाळ व शेजारी राष्ट्रांमध्ये विश्‍वास निर्मिती होऊ शकलेली नाही आणि या स्थितीमुळे विकासाला देखील चालना मिळू शकली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नेपाळ व भारताची सीमा खुली असल्यामुळे त्याठिकाणी नियंत्रित व्यवस्था नाही. मात्र येत्या काळात सुरक्षा, समृद्धी आणि विकास याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताने नेपाळला अनेकदा मदत केली, त्यामुळे या क्षेत्रातील नेतृत्व मोठेपणाने भारताने स्वीकारून शिक्षण, विकास, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. शेजारी दोन्ही देश गुण्यागोविंदांने नांदावे ही निसर्गाची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी उभय देशाच्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही कटवाल यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकातून उमेश अंधारे यांनी चर्चेच्या विषयामागील भूमिका विशद केली. रुक्मांगद कटवाल यांचे स्वागत डॉ. कुमार शास्त्री केले. कटवाल यांच्या व्याख्यानानंतर उपस्थित नागरिकांनी प्रश्‍नोत्तर सत्रातून सूचना व शंका-समाधान केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय कुटुंब प्रबोधन प्रमुख डॉ. रवींद्र जोशी, डॉ. दिलीप गुप्ता, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे, सहकार्यवाह रवींद्र बोकारे, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. रमा गोळवलकर, अनिल पत्की, वनराईचे गिरीश गांधी, कर्नल सुनील देशपांडे, कॅप्टन शिवाली देशपांडे, माजी महापौर डॉ. कल्पना पांडे, डॉ. मृणाल कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *