प्रशासकीय अधिकारी अन् राजकीय नेत्यांची निष्क्रीयता… हतबल भाविक अन् हतबल नागरिक!! पंढरपूर लाईव्ह विशेष – दि.11 जुन 2017
(भगवान वानखेडे)
ऐन आषाढी वारीच्या तोंडावरच चंद्रभागेच्या पात्रात बुडून चार निष्पाप बालकांचा काल करुण अंत झाला. या घटनमुळे अवघ्या पंढरपूरकरांसह समस्त विठ्ठल भक्तांचे हृदय हेलावून गेले. या बालकांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उभे राहिले..! पंढरीतील चंद्रभागेच्या पात्रात होणारी वाळु चोरी व त्यामुळे पडणारे खड्डे…? उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार..? पालकांचा बेजबाबदारपणा…? या प्रश्नासोबतच प्रशासकीय अधिकार्यांच्या व राजकीय नेत्यांची निष्क्रीयताही या घटनेमुळे अधोरेखीत झालेली असून पंढरीत येणारे वारकरी भाविक भक्त आणि पंढरपूरचे नागरिक मात्र हतबल झालेले आढळून येत आहेत..!
वाळु चोर आणि महसुल अधिकारी..!
या दुर्घटनेमुळे चंद्रभागेच्या पात्रातील वाळुचोरीमुळे पडणार्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी आषाढी यात्रेपुर्वी चंद्रभागेच्या पात्रातील खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाला करावे लागते. याचे मुख् कारण आहे ते म्हणजे ‘चंद्रभागेच्या पात्रातून अहोरात्र होणारी वाळुचोरी..!‘ प्रशासनाने येथील वाळुचोरी रोखण्यासाठी कितीही उपाययोजना अवलंबल्या तरी त्या प्रभावीपणे राबविण्यास महसुल अधिकारी सपशेल अपयशी ठरतात. नेमके येथील महसुल खात्याचे अधिकारी अन् कर्मचारी करतात तरी काय? हा प्रश्न अभ्यासण्याजोगाच आहे. चंद्रभागेच्या पात्रात पडलेल्या खड्ड्यांमुळे पात्रात उतरणार्या व्यक्तीला पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. आणि मग बुडून मृत्यु होण्याच्या घटना घडतात. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांचे आषाढी वारीपुर्वीचे दौरे होतात. भाविकांच्या सोयी-सुविधांबाबत अधिकार्यांच्या चर्चा होतात. पत्रकारांनी वाळुचोरीबाबतचा प्रश्न उपस्थित केल्यावर यावर कडक उपाययोजना करण्यात आल्यात असे सांगितले जाते परंतु ‘प्रत्यक्षात आळीमिळी गुप्प चिळी‘ असे महसुल अधिकारी अन् वाळु चोरांचे ‘मस्त‘ चाललेले असते. याकडे ना वरीष्ठ अधिकार्यांच्या लक्ष नसते ना राजकीय नेत्यांचे..! काल ही बालके नदीपात्रात उतरल्यानंतर साहजिकच पात्रात पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बडले असणार यात वाद नाही..! त्यामुळे या बालकांच्या मृत्युस सर्वस्वी वाळु चोर आणि निष्क्रीय महसुल अधिकारी हेच आहेत असे मत नागरिकांमधून व्यक्त होताना आढळत आहे.
उपजिल्हा रुग्णालय.. असुन अडचण अन् नसून खोळंबा..!
पंढरपूरचे उपजिल्हा रुग्णालय जेंव्हापासून अस्तित्वात आलेय तेंव्हापासून या रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत सुरु असलेली ओरड आजही कायम आहे. मुळात या रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी सक्षम असायला हवा मात्र दुर्दैवाने तसे घडत नाही. डतत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गायकवाड यांचे नांव वगळले तर या रुग्णालयाला प्रामाणिकपणे अंग झाडून शिस्तबध्द कार्य करणारा वैद्यकीय अधिकारी लाभलाच नाही. त्यामुळे या रुग्णालयासाठी शासनाकडून कोट्यावधींचा निधी येवूनही त्याचा विनीयोग रुग्णांचे सोयी-सुविधांसाठी झालेला आढळून येत नाही. या रुग्णालयातरले प्रमुख प्रश्न आहेत ते असे, 1) डॉक्टर वेळेत उपलब्ध नसतात ही बाब अतिशय गंभीर आहे. या मुलांना दाखल केले तेंव्हाही अशीच गत असल्याची चर्चा आहे. 2) रुग्णालयातली स्वच्छता- बेडशीट, चादरी वेळेत धुतल्या जात नाहीत, रुग्णालयातील टॉयलेट बाथरुम स्वच्छतेअभावी बंद असून इथे अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. रुग्णालय परिसरसुध्दा अस्वच्छच आहे. 3)पिण्याचे पाणी:- या रुग्णालयात पिण्याचे पाण्याची कोणतीही सुविधा नाही. डॉ.पंकज गायकवाड असताना त्यांनी उपलब्ध केलेले वॉटर प्युरीफायर बंद अवस्थेत आहे. एकुणच स्वच्छतेचे काम ज्या ठेकेदारांना दिले जाते त्यांच्यावर, स्थानिक डॉक्टरांवर व कर्मचार्यांवर मुख्य वैद्यकीय अधिकार्यांचे नियंत्रण नसणे ही बाब गंभीर आहे. आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ‘इथे उपचार होणार नाही, खाजगी दवाखान्यात न्या‘ असा सल्ला सर्रास देणारी येथील डॉक्टरमंडळी इथे आहेत अशी चर्चा कालच्या घटनेवेळी चांगलीच रंगली होती. ही बाब लाजीरवाणी आहे. काल जेंव्हा ही मुले दाखल करण्यात आली तेंव्हा बाहेरच्या दवाखान्यात द्या असा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला, त्यानंतर खाजगी दवाखान्यातून मुलांचा मृत्यु झाला असल्याचे सांगिून पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. इथे आणल्यानंतर तर कळसच झाला… या मुलांच्या मृतदेहांना अॅडमिट करुन त्यांना सलाईन आणि ऑक्सीजनचे नळकांडे लावून उपचाराचा फार्स करण्यात आला. ही बाब उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेवर तर अंकुश ठेवतेच पण माणुसकीचा कोणताही मागमुस यांना नसल्याचेही अधोरेखीत करते. या रुग्णालयातील अनागोंदी कारभारावर वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी कायमच कानाडोळा केलेला दिसून येतो. कारण आजतागायत येथील प्रश्न ‘जैसे थे‘ आहेत. या मुलांवर वेळीच उपचार झाले असते तर ते वाचले असते. त्यामुळे या मुलांच्या मृत्युस उपजिल्हा रुग्णालयातील निष्क्रीय व्यवस्थाच असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
पालकांचा बेजबाबदारपणाही अधोरेखीत..!
केवळ सहा आणि आठ वर्षे वयाच्या मुलांना नदीपात्राकडे जाऊ देणार्या पालकांच्या बेजबाबदारपणाची चर्चाही काल दिवसभर पंढरीत चालु होती. ही मुले गवळी समाजाची होती. अर्थातच गवळी समाजाचे लोक नदीच्या काठावर म्हशी सांभाळण्यास जात असतात. ही मुलंही अशीच गेली असतील आणि नदीपात्रात उतरली असतील परंतु खडड्यांचा अंदाज न आल्याने दुर्दैवाने या मुलांचा बुडून मृत्यु झाला. अशी चर्चाही सुरु होती. एकुणच आपल्या लहान मुलांना जपण्याचे त्यांच्याकडे लक्ष देण्याचे पहिले कर्तव्य हे पालकांचे असते. आणि हे कर्तव्य पालन करण्यास निश्चितच या मुलांचे पालक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या मुलांच्या दुर्दैवी मृत्युस पालकसुध्दा तेवढेच जबाबदार आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
पंतप्रधानांनीच पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे..!
पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मीक नगरी आहे. येथे दरवर्षी लाखो विठ्ठलभक्त येत असतात. येथे उपजिल्हा रुग्णालयाव्यतीरिक्त कोणतेही मोठे सरकारी रुग्णालय नाही. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयातील असुविधांकडे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष देऊन केंद्रीय पातळीवर हालचाली करुन या रुग्णालयातील सुविधा सक्षम कराव्यात. अशी मागणंी नागरिक व वारकर्यांमधून होताना दिसत आहे.
चार बालकांच्या बुडून मृत्यु झाल्याची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आषाढी यात्रा तोंडावर आलेली आहे. वारकरी सांप्रदायामध्ये चंद्रभागेचे स्नानासाठी अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे नदीपात्र स्नानासाठी सुरक्षीत करणे ही प्रशासनाची प्रथम जबाबदारी आहे. ती युध्दपातळीवर होणं अत्यावश्यक आहे. याचसोबत उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न सुटणंही आवश्यक आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111






