पिंपरी, (प्रतिनिधी) – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाविक आळंदीत येण्यास सुरुवात झाली असून प्रस्थानानंतर वारकऱ्यांना मार्गक्रमण करताना कोणतीही अडचण जाणवू नये, याकरिता आळंदी-पुणे पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी येत्या शनिवारी (दि. 17) प्रस्थान ठेवणार आहे. या दिवशी आळंदीतील आजोळघरी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. सोहळ्यात राज्याबरोबरच परराज्यांतील लाखो भाविक सहभागी होत असतात. दरम्यान 3 जुलैला हा पालखी सोहळा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायी कापून पंढरपूरला पोचणार आहे. पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण होत असलेला रस्ता पालखी महामार्ग म्हणून शासनाने घोषित केला आहे. केंद्र सरकारकडून हा महामार्ग विकसित केला जाणार असल्याचे केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने काळेवाडी ते बोपखेल (गणेशनगर) दरम्यानचा पालखी महामार्ग विविध टप्प्यात विकसित केला जात आहे. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. अनेक ठिकाणचे काम पूर्ण झाले असून मॅगझिन ते काळेवाडी दरम्यान अनेक ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना या ठिकाणावरून पायी प्रवास करावा लागणार असल्याने या मार्गावरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
आळंदीहुन निघालेल्या माऊलीं सोहळ्याचा थोरल्या पादुका येथे पहिला विसावा आहे. पालखी महामार्ग विकसित करत असताना याठिकाणी असलेल्या थोरल्या पादुका मंदीराजवळ संत नामदेव-संत ज्ञानेश्वर भेट संकल्प चित्र साकारण्यात येणार असल्याने या मंदिराभोवती दुतर्फा रस्त्याची रचना करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणचे काम अद्यापही रेंगाळले आहे. आळंदीहुन या मार्गाने निघाल्यानंतर शामा इस्टेटजवळ, आंबा फाटा, चंद्रफुल गार्डन व बालाजी मंदिर या प्रमुख ठिकाणचे काम संथ गतीने सुरू आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




