नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले.
पंढरपूर LIVE
अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.०४ जुलै २०१७ रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा कामाला लागली असुन यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली.
नगरपरिषदेने प्रदक्षिणा रस्त्याचे व शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे यात्रेपुर्वी करण्यास सुरुवात केली असुन काही भाग डांबरीकरण करण्यात आलेला आहे. तसेच स्टेशन रोड, अर्बन बँक ते नाथ चौक, सावरकर पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट तसेच संपुर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरील येथील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असुन अतिक्रमण काढण्यासाठी विशेष पथकाची निर्मीती करण्यात आली आहे. त्या पथकामार्फत अतिक्रमण काढण्याचे काम युद्धपातळीवर काम चालु आहे. तसेच वाळवंटात येणा-या यात्रेकरुंना चालण्यासाठी जुना पुल ते पुंडलिक मंदीर व या मुख्य रस्त्याला लागुन नदीपर्यंत उपरस्त्याची आखणी करण्यात येत आहे. तसेच पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत ६ हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर असे एकुण ३० मेटल हायमास्ट दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण वाळवंटात पडणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये २९० व वाखरी तळावर १४८ मेटल हायमास्ट, सोडियम व्हेपर दिवे बसविण्यात येणार आहे. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरुंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुन नदीच्या वाळवंटामध्ये ४५ नळ बसविण्याचे काम चालु आहे. तसेच वाळवंटात विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार असुन जिल्ह्यातील मोहोळ व मंगळवेढा नगरपरिषदेचे कर्मचा-यांमार्फत स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच वाळवंटात उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात येणार आहे. तसेच नदी पात्र, पत्राशेड, ६५ एकर, मनिषा नगर, मंदिर परिसर दक्षिण बाजु येथे आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन २४ तास अग्निशमन वाहन उभे करण्यात येणार आहे. पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशामकाला त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे. शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. गोपाळपुर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व १३० विद्युत पंप उपलब्ध असुन याद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान ४५ टँकर द्वारे संपुर्ण शहरात विशेष: ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यासाठी शासनाकडे पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. यात्रा कालावधीत पुर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आला असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला असुन नगरपरिषदेच्यावतीने ११०० सफाई कर्मचा-यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये प्रत्येक मोठ्या मठांमध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लोखंडी बॅरेल ठेवण्यात यावे अशी सुचना मठाधीपतींना देण्यात आलेली आहे. तसेच ३६ घंटागाडी द्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ८ वाहने, ८ शासकीय टिपर, १ कॉम्पॅक्टर, ३ डंपरप्लेसर, २ डंपिंग ट्रॉलिने १२५ कंटेनर मार्फत दररोज १०० ते १२० टन कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदीपात्रामध्ये खास महिलांसाठी विविध ठिकाणी प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.
जैविक पद्धतीने तयार होणारे बायोकल्चर नदीच्या पात्रात फवारणी करुन दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. तसेच शहरामध्ये दोन ठिकाणी सुलभ शौचालये ४० सीट, वाल्मिक आवास योजनेतुन बांधण्यात आलेले ३ ठिकाणी ३० सीट, ३५ ठिकाणी २२६ सीट सार्वजनिक संडास असुन तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत बांधण्यात आलेले २० ठिकाणी १४५५ सीट, नदीपात्रात ४५० सीट, ६५ एकर मध्ये ४०० सीट, वाखरी पालखी तळ येथे ३०० सीट तसेच शहरात विविध ठिकाणी ३५० असे एकुण १५०० प्रिफॅब्रिकेटेड संडास बसविण्यात येणार आहेत.
तसेच शहरातील न.पा.चे बोअर मठातील विहीरी, आडामध्ये मदर सोल्युशन टाकुन क्लोरीनेशन करण्याचे काम सुरु आहे. शहरात यात्रा कालावधीमध्ये पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट या ५ ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात येणार आहे. तसेच यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे ५० कॉटचे हंगामी स्वरुपाचे संसर्गजन्य रुग्णालय स्थापित करण्यात येणार आहे. शहरामध्ये प्रथमोपचार केंद्रावर ३५ वैद्यकीय अधिकारी, २० परिचारीका, कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. तसेच १०८ च्या अॅम्बुलन्स २४ तास कार्यरत राहणार आहेत. शहरामध्ये उलटी, जुलाबाचे पेशंट आढळल्यास त्वरीत (०२१८६) २२३८८२ या दुरध्वनीवरुन नगरपरिषद दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय येथे उघडण्यात येणार आहे. त्याचा दुरध्वनी क्र.२२३२५३ असा राहिल. नगरपरिषद टोल फ्री नंबर १८००२३३१९२३ आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष सौ.सुजाता त्रिंबक बडवे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते, सर्व सभापती व नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन करण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




