👁 10 Views

‘डॉक्टर’ने केली इच्छामरणाची मागणी

कॅन्सरचा उपचार खर्च आवाक्याबाहेर
पुणे, १६ जून
कर्करोगावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डॉक्टर भारत मारुती लोटे यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून मुंबई उच्च न्यायालयाकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने डॉक्टर भारत यांना ग्रासले आहे. उपचारादरम्यान त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियांचा खर्च २९ लाखांच्या घरात गेला असून दिवसेंदिवस हा खर्च वाढतो आहे. डॉक्टर भारत यांनी तो परवडत नसल्याने उच्च न्यायालयाकडे इच्छा मरणाची मागणी केली.
डॉक्टर भारत लोटे हे गेल्या २६ वर्षांपासून चिपळूणमधील रामपूर या गावात असलेल्या प्राथमिक वैद्यकीय उपचार केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना यावर्षी मार्च महिन्यात स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यांच्या कुटुंबाने त्यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. पण तोवर उशीर झाला होता. कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर कर्करोगाने ग्रासले असल्याचे चाचण्यांमधून समोर आले. डॉक्टर भारत कर्करोगातून बरे होतील याची शक्यता खूप कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, पण आम्ही आशा सोडली नाही असे डॉक्टर लोटे यांच्या पत्नी संगिता यांनी म्हटले आहे.
डॉक्टर भारत यांच्यावर एप्रिल महिन्यात तीन शस्त्रक्रिया झाल्या. २९ लाखांच्या घरात त्याचा खर्च गेला. डॉक्टर भारत यांच्या प्रॉव्हिडन्ट फंडातून ३ लाख रुपये, घर आणि दागदागिने गहाण ठेवून ११ लाख रुपये आणि नातेवाईक-मित्रांकडून १० लाख रुपये असे २४ लाख रुपये आम्ही जमवले. पण हा खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. तसेच एकदा डॉक्टर भारत यांना अति-दक्षता विभागातही ठेवण्यात आले. डॉक्टर भारत यांचे आगाऊ वेतन काढावे अशी मागणी आम्ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे केली होती. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असेही संगिता लोटे यांनी म्हटले आहे. या सगळ्या वाढत्या खर्चाचा दबाव आता कुटुंबावर आला आहे. तसेच ज्यांनी आम्हाला कर्ज म्हणून रक्कम दिली ते देणेकरीही पैशांची मागणी करत दारात उभे राहात आहेत. हा तणाव आता सहन होण्यासारखा नसल्याने आम्ही इच्छामरणाची मागणी उच्च न्यायालयाकडे केली असल्याचेही संगिता लोटे यांनी स्पष्ट केले आहे.
छोट्याशा गावात वैद्यकिय सेवा मिळावी म्हणून डॉक्टर भारत लोटे यांनी आयुष्यातील २६ वर्षे सेवा दिली. त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ना. धों. कर्वे पुरस्कार आणि अहल्या जोशी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आता अडचणीच्या काळात आम्हाला सरकारची काहीही मदत मिळत नसल्यामुळे आम्हाला इच्छामरणाशिवाय पर्याय उरलेला नाही. आम्ही यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला जबाबदार धरत आहोत कारण आमच्यापुढे त्यांनी कोणताही पर्याय ठेवलेला नाही, असेही डॉक्टरांच्या पत्नी संगिता यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉक्टर सतीश पवार यांनी डॉक्टर लोटे यांच्या कुटुंबातर्फे आगाऊ वेतनासंदर्भात कोणताही विनंती अर्ज आमच्याकडे आल्याची माहिती नाही, असे म्हटले आहे. तसेच असा मागणी अर्ज आल्यास आम्ही तातडीने वेतनाची रक्कम देऊ, असे आश्‍वासनही दिले आहे.
आता मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टर भारत यांच्या इच्छामरणासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे. इच्छामरण किंवा दयामरण हे आपल्या देशात कायदेशीर नाही, हे उल्लेखनीय. (वृत्तसंस्था)



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *