पुणे : एकीकडे पालखी सोहळ्याने संपूर्ण शहर भक्तिरसात हरवून गेलेले असताना भुरट्या चोरट्यांनी भाविकांच्या मोबाईल व महिलांच्या गंठणावर डल्ला मारला आहे. पालख्यांचे आगमन शहरात होताच अनेक भाविक पादुकांचे दर्शन घेतात. या वेळी पालखी जवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. याचाच गैरफायदा घेत चोरट्यांंनी भाविकांच्या वस्तू चोरल्या आहेत. याबाबत दोन अनोळखी महिलांसह अज्ञात आरोपीवर दिघी व विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अजय महाजन (वय ४५, खडकवासला) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तर विपुल सुर्वे (वय ३१, येरवडा) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अजय हे दिघीतील मॅगझीन चौकात पालखी आल्यानंतर दर्शन घेत असताना दोन अनोळखी महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या व इतर नागरिकांच्या गळ्यातील २ लाख २५ हजारांचे दागिने चोरले. अशाच प्रकारे विपुल सुर्वे हे मेंटल कॉर्नर येथे पालखीचे दर्शन घेत असताना अज्ञाताने त्यांचा ३५ हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला.




