👁 9 Views

पंढरीत येताना मुख्यमंत्र्यांनी कोळी बांधवांसाठी ‘फास’ घेऊन यावे-गणेश अंकुशराव

पंढरपूर (प्रतिनिधी):-  आषाढी एकादशी दिवशी श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या महापुजेला पंढरीत येताना मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी आम्हा कोळी बांधवांसाठी ‘फास’ घेऊन यावे! अशी उद्वीग्न प्रतिक्रिया महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकामध्ये व्यक्त केली आहे.
वर्षानुवर्षे आम्ही आदिवासी कोळी जमातीचे बांधव आपल्या न्याय हक्कासाठी भांडतो आहोत; परंतु आमची एकही मागणी अद्याप पुर्ण केली गेली नाही. भाजपा चे सरकार सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांचेसह भाजपा पक्षश्रेष्ठींनी आम्ही सत्तेत येताच कोळी समाज बांधवांना न्याय देऊ असे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांनी हे आश्‍वासन पाळले नाही. आमच्या समाजातील बेरोजगार सुशिक्षीत तरुणांच्या हाताला काम नाही. आमच्या माता-भगिणींच्या खोल गेलेल्या डोळ्यातून अहोरात्र गळणार्‍या आसवांना हातावर हात ठेवुन नुसतं पहात बसणं आत्ता आम्हाला सहन होत नाही. आमच्या दु:खाचा अंत पाहणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी आषाढी यात्रेला पंढरीत येताना आम्हा कोळी बांधवांसाठी ‘फास’ घेऊन यावे! जगणं कठीण होऊन बसलेल्या कोळी बांधवांना आता मरण पत्करणं हाच पर्याय शिल्लक उरला असून, ‘‘मुख्यमंत्र्यांनी एक तर आमच्या मागण्या मान्य कराव्यात अथवा स्वत:च्या हाताने आम्हाला फासावर चढवावेे!’’ अशी उद्वीग्न प्रतिक्रिया या प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
आदिवासी कोळी जमातीच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. या पैकी प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. समाजाचा सर्वात गंभीर प्रश्‍न म्हणजे या समाजातील काहींना जातीचे दाखले मिळतात तर अनेकांना जातीचे दाखले मिळत नाहीत. वरिष्ठांचे आदेश असूनही जातीचे दाखले का दिले जात नाहीत..? 1950 पुर्वीचे या समाजातील जातीचे पुरावे उपलब्ध असूनही शासन हे दाखले देण्यासंदर्भात ठोस पावले उचलत नाही. कित्येकांना जातीचे दाखले नसल्यामुळे आपली नोकरी गमवावी लागली आहे. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक पंढरीतील चंद्रभागेच्या पात्रात त्यांना जिथून इंग्रजांनी अटक केली त्या स्थानावर व्हावे तसेच त्यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा ही मागणीही प्रलंबीत आहे. चंद्रभागेवर सारडा भवन घाटापासून ते नदीच्या पलीकडे शेगाव दुमाला गावाला जोडणारा ‘पुंडलिक सेतू’ हा पुल बांधण्याचे कामास कोळी बांधवांचा तीव्र विरोध आहे. या पुलामुळे पिढ्यानपिढ्या होडी चालवण्याचा व्यवसाय बुडीत निघणार आहे. अनेकांचे संसार या होडी व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे हा पुल बांधणे रद्द करावे ही मागणीही प्रलंबीत आहे. सर्वात महत्वाची मागणी म्हणजे भाजपा सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘नमामी चंद्रभागा’ या उपक्रमात कोळी समाजातील सदस्यांचा समावेश करावा अशी मागणी आहे. तसेच होडीचालकांना कायमस्वरुपी विनामुल्य परवाने (लायसन्स) मिळावेत. ही मागणीही प्रलंबीत आहे. अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे चे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष इ. जी. भालेराव यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, ठाकूर, ठाकर मन्नेवारलू इत्यादी आदिवासी जमातींची बदनामी करुन त्या जमातींची मानहानी करीत बुध्दीपरस्पर व पुर्वग्रहदुषीत सुडबुध्दीने त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचीत ठेवण्याचा घोर अपराध केला आहे. त्यांनी आदिवासी समाजावरच अन्याय केला नसून त्याचसोबत इतर अधिकार्‍यांच्या हक्कावरही गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. तरी भालेराव यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम 1979 व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. ही मागणी सुध्दा प्रलंबीत आहे. 
लवकरात लवकर कोळी समाजास जातीचे दाखले मिळणेसाठी पावले उचलावीत, जातीचे दाखले नसल्याचे कारणामुळे नोकरीतून काढलेल्या सर्वांना पुन्हा नोकरीस घ्यावे, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे राष्ट्रीय स्मारक चंद्रभागा पात्रात उभारावे, त्यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, आदिवासी कोळी समाजावर होणारा अन्याय दुर करावा, पुंडलिक सेतू रद्द करावा, व नमामी चंद्रभागेत कोळी समाजातील सदस्यांचा समावेश करावा. तसेच शेतकर्‍यांचे संपुर्ण कर्ज माफ व्हावे. या मागण्या मान्य न झाल्यास आमच्या समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी येताना ‘फास’ घेऊन यावेत व आम्हाला फासावर चढवावे! आदी मागण्या या निवेदनाद्वारे महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केल्या आहेत.     
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *