👁 7 Views

बलात्कार स्रीयांवर होतात की जातींवर ?

गणेश गायकवाड
गर्दीचा विट येतो, म्हणून लहानपनापासूनच एकांतात रमायची सवय लागलीय…सकाळी नऊ दहाची वेळ होती, लेक्चर ऑफ होतं म्हणून एकटाच कॉलेज च्या कट्टयावर बसलो होतो, शेजारीच पाच सहा जणांचं टोळकं बसलं होतं…’गल्लीतल्या गुदी पासून दिल्लीतल्या मुदिपर्यंत’ गप्पा चाललेल्या. सहजा कॉलेज च्या पोरांच्या पाणचट गप्पा ऐकायचं टाळतो मी, पण त्या दिवशी एका पोराचं वाक्य मनाला कापतच गेलं… वाक्य असं होतं – “आमच्या जातीतल्या पुरींवर बलात्कार होऊदे मग बघतो एकएकाचं”
         दोन मिनिटं गंभीर झालो, मनात विचारांची घुसळण सुरु झाली, आमच्या देशाची सर्वात मोठी ताकत म्हणून आम्ही ज्या पोरांकडे बघतो ती पोरं आजुनही जातीच्या बेड्यातून मुक्त व्हायची भाषा बोलताना दिसत नव्हती… लवचंबुकानं लोखंडाला चिटकावं तशी जातील चिटकुन बसली होती… मी त्या टोळक्याकड एकदा नजर टाकली…आणि नजर शून्य करून बसलो…
          बलात्कार ही संकल्पना खूप पूर्वीपासून आपल्याकडं चालत आलीय, पण पूर्वीपेक्षा तिच्या आकडेवारीत झालेली वाढ विचार करायला लावणारी आहे… त्याचं कारण जेव्हा आपण शोधू तेव्हा माझ्या लक्षात येतं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या रांज्या पाटलाचे हातपाय कलम केले होते, आणि आपली व्यवस्था बलात्कार झाला तरी, पीडित स्त्री लाच कोठडीत उभी करून बलात्कार झाला की नाही हे विचारते…तिची फिजिकल चेकअप करते, पण या सगळ्या मध्ये आरोपीला शिक्षा करायची असते हेच विसरून जाते, हे केवढं मोठं दुर्भाग्य…?
      बलात्काराच्या आकडेवारीवर जेव्हा नजर पडते तेव्हा त्याचा आलेख चढत्या क्रमाने दिसतो, मग एवढी सुशिक्षितता वाढून, जनजागृती करून, लाखोंचे मोर्चे काढून आम्ही नक्की काय सिद्ध केलं ? हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे.
         आमच्यात जेव्हा बलात्कार होतो तेव्हा पहिल्यांदा तिची जात पाहिली जातेय,  पेपरमध्ये, सोशल मीडिया वर किंवा टीव्ही वर बातम्या झळकताना सुद्धा ‘दलित महिलेवर बलात्कार’  किंवा ‘ आमुक आमुक जातीच्या महिलेवर बलात्कार’
अशा टायटल नेच झळकत असतात… म्हणजे आमची जात पीडित महिलेच्या मानगुटीवरून ही जात नाही, ही केवढी तिची माजोरी…?
        कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ लाखोंचे मोर्चे निघाले,  मोर्चे काढून निषेध नोंदवावा त्यात गैर काहीच नाही, पण त्या वेळेसची एक घोषणा मला खूप खटकत होती, ती अशी- ‘ मराठ्यांच्या लेकी आम्ही’ आणि त्या वेळेस दलितांचेही प्रतिमोर्चे निघाले, त्यांचीही घोषणा होती की, ‘भीमाच्या लेकी आम्ही…’ अरे लेकी या लेकीच असतात रे, त्या मराठ्यांच्याही नसतात आणि दलितांच्या ही नसतात,  लेकी या ‘माणूस’असतात हे आपण विसरलोय का ?
           आपला समाज पीडित महिलेची जात बघूनच रस्त्यावर उतरतो, याच्या एवढं मोठं दुर्भाग्य ते काय ? पण सर्वांनीच एकगोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की,  बलात्कार हा स्त्रीवर होत असतो, जातीवर नव्हे, बलात्काराने उध्वस्त स्त्री होत असते, जात नव्हे, बलात्काराने भावना स्त्रीच्या मारल्या जातात जातीच्या नव्हे…तरीही बलात्कारासारख्या संवेदनशील मुद्याला जातीय रूप देऊन राजकारण करणारी गिधाडांची कातडी असलेली राजकारणी जमात आमच्यात छाती काढून फिरते, आणि बलात्कार पीडित महिला आयुष्यभर न्याय मिळेल या आशेनं न्याय मंदिराच्या पायऱ्या जिझवत असते…
         खरंतर बलात्कार का होतात ? याचा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा मला आपली समाजव्यवस्था आरोपीच्या कोठडीत उभी करावी वाटते, कारण त्याला आपली व्यवस्थाच जबाबदार आहे, कारण आमच्या पोरांना कधी लैंगिक शिक्षण दिलंच नाही…ज्या गोष्टी आम्हाला लग्नानंतर रोज रात्री करायच्या आहेत त्याबद्दल बोलणे सुद्धा समाज पाप मानतो…समाजाचाच नियम आहे की ज्या गोष्टी तुम्ही जास्त दाबून ठेवता त्या तेवढ्याच प्रेशरने बाहेर पडतात…बलात्काराचं सुद्धा तसंच झालय… सेक्स म्हणजे काय? तो कसा करायचा असतो? सेक्स म्हणजे आयुष्य नाही ? सेक्स बद्दल आमच्या पोरांना कधीच व्यवस्थित व खरी माहिती मिळत नाही, त्यांना माहिती मिळते ती त्यांच्या मित्राकडून…त्यामुळे ही बाब काहीतरी खास आहे असा त्यांचा भ्रम होतो, व या भ्रमातूनच पोरं बलात्काराच्या पातळीपर्यंत येऊन पोचतात…त्या साठी त्यांना सेक्स बद्दल योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे, म्हणूनच शालेय स्थरावरच आता लैंगिक शिक्षण देणे खूप महत्वाचे वाटते..तरंच समाजात घडणाऱ्या विघातक घटनांना योग्य तो चपराक बसेल, त्या साठी आपली मानसिकता बदलणे खूप महत्वाचे आहे..मानसिकता बदला, देश नक्की बदलेल…
 गणेश ब्रह्मदेव गायकवाड
 मु.पो-आंबे, ता – पंढरपूर
 सहजसंपर्क – ८६०५५४००६३

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *