15 Jul. 2017
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद उद्या शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपसह रालोआतील सर्व घटक पक्षांच्या आमदार, खासदार आणि नेत्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच रालोआची भूमिका आणि देशासमोरील समस्यांबाबतही यावेळी चर्चा केली जाणार आहे.
रामनाथ कोविंद यांचे सकाळी पावणेदहाच्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. विमानतळावरून ते मरीन ड्राइव्ह येथील गरवारे क्लबमध्ये जाणार आहेत. येथे सर्व नेत्यांशी संवाद साधल्यानंतर मित्रपक्षांच्या निवडक नेत्यांसोबत ते दुपारचे भोजन करणार आहेत.
त्यानंतर पुढे विमानाने गोवा येथील आमदारांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर कोविंद यांनी देशभर रालोआ नेत्यांच्या भेटीगाठीचा सपाटा लावला आहे.










