👁 10 Views

पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी.. सर्वपक्षीय आमदारांनी दिली भेट

पाथरी (प्रतिनिधी)- पाथरीतील साई जन्मस्थळाविषयी वाद निर्माण झाल्यानंतर रविवारी परभणीतील सर्वपक्षीय आमदारांनी पाथरी येथे जाऊन साई जन्मस्थळाचे दर्शन घेतले व साई मंदिर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी व इतर विश्वस्थांशी सकारात्मक चर्चा केली.


उद्या 20 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिर्डी व पाथरी येथील शिष्टमंडळाची संयुक्त बैठक होणार असून मार्ग न निघाल्यास या बैठकीनंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय कृती समिती सदस्यांनी यावेळी जाहीर केला. विशेष म्हणजे साईजन्मस्थळाचा वाद निर्माण झाल्यानंतर पाथरी येथील साईजन्मस्थळास बाहेरगावहून येऊन भेटी देणाऱ्या व जन्मस्थळी भजन कीर्तन करणाऱ्या भाविकांत लक्षणीय वाढ झाली आहे.


परभणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी पाथरी साई जन्मस्थळासाठी एकवटले असून आज रविवारी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, पाथरीचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे आदींनी साई मंदिर कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, विश्वस्थ सीताराम धानू तसेच इतर विश्वस्थ यांची भेट घेऊन पाथरी जन्मस्थळ विश्वस्थ संस्थेच्या पाठीशी असल्याची भावना बोलून दाखवली. पाथरी येथील साई जन्मस्थळाचा वाद न शमल्यास मंगळवार, 21 रोजी साईजन्मस्थळ मंदिरातील दुपारी आरती करून यानंतर लगेच साईबाबांवर सबुरीच्या मार्गाने संबंध पाथरीकरांची पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे मंदिर कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.


पाथरीच साईबाबांची जन्मभुमी असल्याचे पुरावे  


परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्टेशनपासून १८ कि.मी.वर असलेल्या पाथरी येथे श्री सार्इंचा जन्म झाल्याचे संशोधन १९७५ मध्ये सर्वप्रथम समोर आले. मुंबई येथील साई भक्त विश्वास खेर यांनी हे संशोधन करण्यासाठी २५ वर्षे खर्ची घातली. 


१९७८ साली साई संस्थानच्या नावाने त्यांनी विश्वस्त मंडळाची स्थापना करून पाथरी ही श्री सार्इंची जन्मभूमी असल्याचे सांगितले विश्वास खेर यांनी पाथरी येथील साईभक्त दिनकरराव चौधरी यांची १९७५ ते ७८ दरम्यान भेट घेतली तसेच पाथरी येथील साई बाबांच्या सहवासात आलेल्या अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यात साईबाबांचे वास्तव्य कुठे होते हे सांगण्यात आले साई बाबांचा प्रचार करणारे संत दासगणू महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खेर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीही साई बाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याची बाब समोर आली. तसेच पाथरी येथील साई बाबांचे जन्म ठिकाण असलेल्या जागेत उत्खनन करताना अनेक वस्तू सापडल्या त्यामध्ये धान्य दळण्यासाठीचे जाते, दिवे लावण्यासाठीच्या खापराच्या पणत्या, पुजेची भांडी आणि इतर वस्तुंचा समावेश आहे़

बी.व्ही. नृसिंह स्वामी यांनी लिहिलेल्या ‘डिवाईन आॅफ साईबाबा भाग १’ या ग्रंथात साई बाबा यांच्या पाथरी येथील जन्माचा उल्लेख आहे़ प्रातिनिधी स्वरुपातील हे काही पुरावे असले तरी जवळपास २९ पौराणिक पुरावे पाथरीकरांकडे उपलब्ध असून, हे सर्व पुरावे जगजाहीर असल्याचे संस्थानचे विश्वस्त संजय भुसारी यांनी सांगितले.


संस्थानचे अन्य एक विश्वस्त तथा कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, ३० वर्षांपूर्वी पाथरीतील १०० वर्षांच्या तत्कालीन साईभक्त मदार नाना यांनी पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे सांगितले होते़






Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *