मंगळवेढा उपविभागीय कार्यालयातील तलाठी सूरज रंगनाथ नळे हा सात हजार रुपयांची लाच घेऊन पळाला असून, कारवाईदरम्यान पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी तलाठय़ाचा हस्तक खासगी इसम पंकज महादेव चव्हाण याला अटक केली आहे.
कारवाईची थरारक घटना सूरज नळे याच्या घराजवळ घडली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदाराच्या मित्राच्या शेतजमिनीतून राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 सांगली-सोलापूर हा गेला असून, त्यामध्ये शेतात असलेली पाइपलाइन बाधित झाली आहे. सदर बाधित पाइपलाइनची नुकसानभरपाई म्हणून 1 लाख 43 हजार 794 रुपये मंजूर झाले आहेत.
नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारदार हा शेतकरी मित्राच्या वतीने पाठपुरावा करीत होता. हे प्रकरण तलाठी सूरज रंगनाथ नळे याच्याकडे होते. याप्रकरणी नळे याने आपला हस्तक पंकज महादेव चव्हाण याच्यामार्फत 7 हजार रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली.
तलाठी सूरज नळे याने तक्रारदाराकडून घराजवळ लाचेची रक्कम घेतली. त्यावेळी आपल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचल्याची माहिती मिळताच लाचेची रक्कम घेऊन तो पळून गेला.
त्याला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी पाठलाग करीत असताना एक अधिकारी जखमी झाला. तलाठ्याचा हस्तक पंकज चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. तलाठी नळे फरार असून, मंगळवेढा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार मुल्ला, घाडके, सण्णके, उडाणशिव यांच्या पथकाने केली आहे.



