पंढरपूर – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करत स्वेरी संचलित सर्व महाविद्यालयांतील वर्ग सध्या बंद आहेत तरी देखील स्वेरीच्या परंपरेला अनुसरून स्वेरी कॅम्पसमध्ये राहणारे एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.
कोरोना व्हायरसचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासन व पू.अ.हो.सोलापूर विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि.१५ मार्च पासून स्वेरी अंतर्गत असणाऱ्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांचे तसेच एम.बी.ए.चे वर्ग बंद केलेले आहेत. या बंदच्या कालावधीतच थोर महामानवांची जयंती आली. प्रत्येक वर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना विविध साहित्यीकांच्या व विचारवंतांच्या व्याख्यानांची बौद्धिक मेजवानी मिळत असते तसेच विविध उपक्रमही आयोजित केले जातात. डॉ. आंबेडकर जयंती निमित्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मागे ‘मेसा’ अंतर्गत सलग १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम आयोजित केला होता तसेच पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै. शिवाजीराव भोसले, पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रा. हरी नरके, उद्योगपती व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत मा. संतोष थिटे, व्ही.जे.टी.आय. चे माजी प्राध्यापक डॉ.संजय मंगला गोपाल व पुण्याच्या इन्फर्मेशन टेक्नोलोजी सेंटरचे संचालक प्रा. प्रवीण रेवणकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले होते. यावेळी मात्र ही प्रथा खंडित होईल असे वाटले परंतु बौद्धिक मेजवानी न देता स्वेरीत डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॅम्पसमध्येच वास्तव्यास असलेले एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी पुढाकार घेऊन डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे सरांनी सांगितल्याप्रमाणे घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आपण सर्वांनी स्मरण करावे’ असे आवाहन प्रा. करण पाटील यांनी यावेळी केले. तसेच दि.११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची देखील जयंती स्वेरीत साजरी करण्यात आली होती. एकूणच वर्ग बंद असले तरी स्वेरीने पूजनाची परंपरा मात्र कायम ठेवली याचीच चर्चा सुरु आहे. यावेळी स्वेरी कॅम्पसमधील प्रा. संजय मोरे, इलेक्ट्रिकल सुपरवायझर संतोष जाधव, लॅब असिस्टंट बालाजी सुरवसे, गणेश पाटील यांनी सोशल डीस्टन्सिंग पाळत डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन केले.
छायाचित्र: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्रा.करण पाटील.

