👁 13 Views

स्वेरी’चे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड कोविड-१९ व पी.एम.केअर्स फंडाला आर्थिक सहाय्य

पंढरपूर : श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर अर्थात ‘स्वेरी’ आपल्या अनोख्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याबद्दल ओळखली जातेच पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत गरजवंतांना मदत करण्याची परंपरा देखील स्वेरीने जपली आहे. सध्या भारताच्या विविध राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर या विषाणूचा संसर्ग झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी देशामध्ये तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊनची परिस्थिती असताना वैद्यकीय व सामाजिक सेवेसाठी देशपातळीवर तसेच राज्यपातळीवरही आर्थिक मदतीचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त जाणीवेतून श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीट्यूट या संस्थेने व या संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या चारही महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून पी.एम.केअर्स फंडाला रु. ३००००० (रु. तीन लाख) व चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड कोविड-१९ ला रु.४५०००० (रु. चार लाख पन्नास हजार) इतकी आर्थिक मदत केली आहे.

वेळोवेळी समाजासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विश्वस्त नेहमीच भरीव योगदान देत असतात. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाशी मुकाबला करत असतांना आपल्याबरोबरच समाजाचाही विचार करत हा मदत निधी संस्थेने उभा केला आहे. मागेही केरळ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी व कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी अशाच पद्धतीने स्वेरीने मुख्यमंत्री सहायता निधीला भरीव मदत केलेली होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *