👁 9 Views

संत नामदेवांचा समाधी सोहळा साधेपणाने साजरा

पंढरपूर (प्रतिनिधी) ः श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा 670 वा संजीवन समाधी सोहळा शनिवार दि. 18 जुलै रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून वारकरी, भाविक व शिंपी समाज बांधवांनी आपापल्या घरीच धार्मिक कार्यक्रम व पूजन करण्याचे आवाहन संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी केले होते. त्यानुसार वारकरी, भाविक व शिंपी समाज बांधवांनी आपल्या घरीच प्रतिमेचे पूजन केले.  संत नामदेव मंदिरात फक्त धार्मिक विधी करून प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून समाधी सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.
संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा संत नामदेव मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. मात्र यावर्षी संपूर्ण जगात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने देशात व राज्यात सर्वत्र संचारबंदी केली होती. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. तरी सर्व शिंपी समाज बांधव, वारकरी, भाविक व फडकरी मंडळींनी आपापल्या घरीच संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करावा. असे आवाहन नामदास महाराजांनी केले होते. त्यानुसार आपल्या घरीच संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती करून पसायदान म्हणून नैवेद्य दाखवला. तसेच ज्याठिकाणी मठ, मंदिरात समाधी सोहळा साजरा केला जातो तेथे भाविक, नागरिकांना न बोलवता फक्त पुजारी व मानकर्‍यांनी धार्मिक विधी करून पूजन केले.
संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिर येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोणालाही प्रवेश न देता फक्त महाराज मंडळींच्या उपस्थितीत भजन, किर्तन, प्रवचन आंदी धार्मिक कार्यक्रम झाले. मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत गुरुवारी एकादशी दिवशी नामदास महाराज व फक्त 3 सेवेकर्‍यांनी दिंडी काढून नगर प्रदक्षिणा केली. शनिवार दि. 18 रोजी संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम झाला. संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारीत ह.भ.प. नामदास महाराजांचे किर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. या दिवशी पहाटे व दुपारी श्री केशवराज, संत नामदेव-जनाबाई यांची महापुजा मानकरी शिवकुमार भावलेकर, युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. तसेच समाजाचे विश्वस्त शशिकांत जवंजाळ यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी मंदिरात भाविक, वारकरी व समाज बांधवांना प्रवेश देण्यात आला नाही. फक्त महाराज व मानकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त समस्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले.
रविवारी संत सावता माळी यांच्या समाधी सोहळ्याचे किर्तन झाले. तसेच आमावस्ये दिवशी सोमवार दि. 20 रोजी काल्याचे किर्तन व सायंकाळी मंदिरातच पालखी सोहळा पार पडला. समाधी सोहळा कार्यक्रमासाठी सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्यासह विठ्ठल, एकनाथ, मुरारी, निवृत्ती, हरी, भावार्थ महाराज व नामदास परिवाराने परिश्रम घेतले.
कोरोनामुक्तीचे साकडे
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोक याला बळी पडत आहेत. तरी देश व राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे कोरोनापासून रक्षण कर असे साकडे ह.भ.प. नामदास महाराज व पुजेचा मान मिळालेल्या मानकर्‍यांनी श्री केशवराज (विठ्ठल) व संत नामदेव महाराजांच्या चरणी घातले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *