👁 9 Views

महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे पार्थिवावर बोरामणी येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी; शारिरिक व्याधी आणि आर्थिक विवंचनेमुळे विपन्नावस्थेत झाला शेवट

 

Pandharpur Live Online: महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख (वय ५४) यांचे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या विकाराने गुरूवारी दुपारी सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. काल सायंकाळी बोरामणी गावात शोकाकुल वातावरणात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. 

अतिशय बिकट परिस्थितीत त्यांचा शेवटचा काळ व्यतीत झाला. शारिरिक व्याधी आणि आर्थिक विवंचनेमुळे विपन्नावस्थेत त्यांचा शेवट झाला. न्यूझीलंडमधील राष्ट्रकूल स्पर्धेत अनेक भल्या भल्या मल्लांना लोळवून सुवर्णपदक मिळवणाऱ्या या तांबड्या मातीतील मल्लाची अखेर मन हेलावणारी ठरली. 

खरं तर शासनाकडून आपल्या राज्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या अशा मल्लांच्या वृध्दापकाळासाठी काहीतरी भरीव तरतूद करणं आवश्यक आहे; परंतु दुर्दैवाने लोकप्रतिनिधी आणि शासनाची एकुणच यंत्रणा याबाबतीत उदासिनता दाखवते. हे शेख यांच्या जीवनप्रवासावर नजर टाकल्यास ठळकपणे अधोरेखित होते.

लाल मातीत कुस्त्या खेळून लौकिक मिळवेपर्यंत कुस्तीपटूंना संस्था, संघटना, शासन, दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळते. परंतु हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर गेला की एकाकी पडतो. आप्पालाल शेख यांच्या बाबतीतही दुर्दैवाने हेच घडले. 

सोलापूरजवळील बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आप्पालाल शेख यांनी १९९३ साली पुण्यातील कुस्ती अधिवेशनात संजय पाटील यांना आस्मान दाखवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. महाराष्ट्र केसरी किताब मिळविणारे त्यांच्या घरातील तिघेजण आहेत. यापूर्वी त्यांचे थोरले बंधू इस्माईल शेख हे १९८० साली खोपोली येथे कुस्ती अधिवेशनात महाराष्ट्र केसरी झाले होते. त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी जालना येथे २००१-०२ साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. एकाच घरातून तिघे मल्ल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे बोरामणीचे एकमेव शेख कुटुंबीय आहे.

अल्पभूधारक असलेले शेकुंबर शेख यांना कुस्तीचा छंद असल्यामुळे त्यांनी आपली मुले इस्माईल व आप्पालाल यांना आर्थिक भार सोसत नसतानाही कुस्तीचे धडे घेण्यासाठी १९८५-८६ साली कोल्हापूरला शाहूपुरी तालमीत पाठवले होते. वस्ताद मोहम्मद हनीफ यांच्या तालमीत दोन्ही मुले तरबेज झाली. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे आणि वस्ताद मुकुंद करजगार यांनीही कुस्तीचे डावपेच शिकविले होते.

आप्पालाल शेख यांनी भल्या भल्या मल्लांना लोळवून लौकिक मिळवत महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारली. एवढेच नव्हे त्याच सुमारास न्यूझीलंड येथे भरलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत आप्पालाल शेख यांनी भारतातर्फे प्रतिनिधित्व करताना ऑस्ट्रेलिया, इराण, बल्गेरिया व अन्य राष्ट्रांच्या मल्लांना लोळवले आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या मल्लाला आस्मान दाखवत सुवर्णपदकावर स्वतःचे नाव कोरले होते. ‘घिस्सा’ डाव टाकून कुस्ती जिंकणे ही आप्पालाल यांची विशेष हातोटी होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.


कुस्तीची घरातील परंपरा पुढे नेण्यासाठी आप्पालाल यांनी आपली मुले अश्फाक, अस्लम आणि गौस्पाक यांना कोल्हापूरला पाठवले होती. तेथे मुलांचा सराव सुरू असतानाच इकडे गावात आप्पालाल यांना मधुमेह बळावला आणि मूत्रपिंडाच्या विकाराने पछाडले. शासनाकडून मिळणारे मानधन तुटपुंजे आणि तेसुध्दा वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतीवर अवलंबून राहिलेल्या शेख कुटुंबीयांची परवड सुरू झाली. अशा विपन्नावस्थेत काही दानशूर मंडळींनी मदतीचा हात दिला. तर आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी तिन्ही मुलांना कोल्हापूर सोडावे लागले. यातच तीन महिन्यांपूर्वी आप्पालाल यांच्या पत्नी साथ सोडून देवाघरी गेल्यामुळे ते आणखी खचले. यातच आजार बळावला आणि आप्पालाल यांचा शेवट झाला. काल सायंकाळी बोरामणी गावात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *