👁 9 Views

श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, त्याग करण्यातून माणसे महान बनत असतात -सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे


पंढरपूरः- ‘आज आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत यामागे अनेक स्वातंत्र्यवीरांचा त्याग आहे. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू व इतर अनेक देशभक्तांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अतोनात कष्ट घेतले, उपोषणे केली व तुरुंगवासही भोगला. मनात आले असते तर हे देशभक्त सुखदायी जीवन जगू शकले असते परंतु, स्वातंत्र्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. देशातील लोकांना पुरेसे कपडे नाहीत ही जाणीव झाल्यावर गांधीजींनी पंचा वापरण्यास सुरुवात केली.

 त्यांनी केलेल्या त्यागामुळे ते आज ‘महात्मा’ म्हणून ओळखले जातात. त्या काळात आय.सी.एस. असणारे सुभाषचंद्र बोस यांनी मनात आणलं असतं तर आरामदायी जीवन जगू शकले असते परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी ‘आझाद हिंद’ सेना स्थापन केली. स्वदेशीचा अवलंब करण्यासाठी बाबू गेनू यांनी विदेशी कपड्यांनी भरलेल्या ट्रक समोर आपले बलिदान दिले. 

आपल्या देशाच्या पूर्वीच्या पंतप्रधानांना ही देशाचा विकास करत असताना अनेक अडथळे आले, विरोध झाला परंतु त्यांनी आपल्या सत्कार्यावरील निष्ठा ढळू दिली नाही. १९८५ मध्ये राजीव गांधी हे पंतप्रधान असताना भारतात कॉम्प्युटरचे आगमन झाले. आपले रोजगार जातील म्हणून अनेकांनी त्याला विरोध केला परंतु आज आपण पाहिले तर कॉम्प्युटरने अनेक रोजगार निर्माण केलेले आहेत. स्वेरी या संस्थेची स्थापना देखील अशाच अडथळ्यांमधून व संघर्षातून झालेली आहे. एकेकाळी चोराचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माळरानावर आज स्वेरी यशस्वीपणे उभी आहे. 



त्याग करण्यातून माणसे मोठी होत असतात. त्यामुळे जीवनामध्ये त्याग करणे फार महत्त्वाचे आहे.’असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले. 


         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ‘आझादी का अमृत महोत्सव’ तथा ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डिप्लोमा अभियांत्रिकीच्या आशिष शिंदे, मानसी राठी व पदवी अभियांत्रिकीच्या साक्षी रुद्रकंठवार या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणजे नेमके काय? हे सांगताना पुढे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी देखील सतत स्वतःमध्ये विधायक बदल करत पुढे गेले पाहिजे. विद्यापीठीय परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा असो, किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःहून आत्मविश्वासाने पुढे राहिले पाहिजे.’ ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’ या त्रैमासिकाचे तसेच चारही महाविद्यालयांच्या विविध विभागांच्या न्यूज बुलेटीन्सचे प्रकाशनही करण्यात आले.


 यंदा स्वेरीचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी स्वेरीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृषी व ग्रामविकासाचे उत्कृष्ट मॉडेल म्हणुन विश्वात प्रसिद्ध असलेल्या हिवरेबाजार (जि.अहमदनगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील ब्रिगेडीअर बोधेज् करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे हे असणार आहेत. यात स्वेरी परिवारातील सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार होणार असून सायंकाळी ‘जागर माय मातीचा’ या अरुण म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या काव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 


यावेळी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार,बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या डिप्लोमा अभियांत्रिकीचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *