👁 6 Views

मेहुण्याकडून कानाखाली खाल्ल्याने चिडला, रागाच्या भरात बायकोलाच भोसकल

 मेहुण्याशी झालेल्या वादात त्याच्याकडून मार खालेल्ल्या एका इसमाने रागाच्या भरात बायकोला भोसकल्याची घटना चर्चगेट स्थानकात घडली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.


घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला चर्चगेट स्थानकाच्या फलाट क्र. 4वर घडली. रोशन नाईक (49) असं आरोपीचं नाव आहे. रोशन हा मूळचा पालघरचा रहिवासी असून तो वेल्डिंगचं काम करतो. तो आणि त्याची पत्नी हेमा यांचा विवाह 20 वर्षांपूर्वी झाला होता.

 या जोडप्याला दोन मुलं देखील आहेत. हेमा एका पतसंस्थेत कामाला आहे. गेल्या काही काळापासून या जोडप्यात सतत वाद होत होते. रोशन हेमावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. त्यांच्या नातेवाईकांनीही त्यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर सहा महिन्यांपूर्वी हेमा रोशनपासून विभक्त होऊन वेगळी राहू लागली.


रविवारी 9 तारखेला हेमा आणि रोशन त्यांच्या नातेवाईकांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला कुलाबा येथे गेले होते. तिथे कार्यक्रमात हेमाचा भाऊ गणेश राठोड याच्यासोबत रोशनचा वाद झाला. गणेशने त्याला हेमाचा छळ करत असल्याचा जाब विचारला. वाद विकोपाला जाऊन गणेशने रोशनला दोन वेळा श्रीमुखात भडकावली. त्याचा संताप झाल्याने रोशन कार्यक्रमातून निघून गेला.

दुपारच्या सुमाराला कार्यक्रम आटोपल्यानंतर हेमा आणि तिचे नातेवाईक चर्चगेट स्थानकात आले. तिथे फलाट क्रमांक चारवर ट्रेनची वाट पाहत असताना अचानक रोशन तिथे आला. त्याच्या हातात चाकू होता. त्याने चाकूने दोन वेळा हेमाच्या पोटात भोसकलं.


 हेमाला रक्तस्राव सुरू झाला. हेमाच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी हेमाला आधी जीटी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हेमाचा भाऊ जयेश याने रोशनविरोधात तक्रार दाखल केली. रोशन याला अटक करण्यात आली आहे. रोशनला हेमाला मारायचं होतं, म्हणून त्याने चर्चगेट स्टेशनला येण्यापूर्वी चाकू खरेदी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. हेमावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *