ऊस दराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मंगळवेढा आणि पंढरपूर येथे रात्री ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली होती
.ऊसदराच्या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी (ता.२६ ऑक्टोबर) रात्री वाखरी येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर चे टायर फोडले आणि त्यानंतर रात्री मंगळवेढा आणि पंढरपूर ऊस वाहतूक रोखली होती. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी ऊसाच्या वाहनांची हवा सोडून आंदोलन करण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामात ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहिर करावी,अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
कालपासून ऊसदर आंदोलन तीव्र झाले असून अनेक भागातील शेतकऱ्यांनी ऊसदराच्या मागणीसाठी ऊस तोडी बंद केल्या आहेत. तर काही ठिकाणी ऊस वाहतूक रोखली जातं आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे ऊस तोडणीची कामे पन्नास टक्के बंद झाल्याने कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. आंदोलना संदर्भात ऊसदर संघर्ष समिती आणि साखर कारखानदार यांची लवकरच बैठक घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सांगितले आहे.




