नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनआधी मुंबईत ‘अँटिलिया’ येथे अंबानींच्या घरात शुभकार्याचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याची पार्टी आयोजित केली होती.
रोका सोहळ्यानंतर मुंबईत परतलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे आप्तेष्टांकडून भव्य स्वागत करण्यात आलं. जोडप्याला आशीर्वाद देताना बॉलीवूडमधील तारे-तारकांनी पार्टीला हजेरी लावल्यानं ‘एंगेजमेंट पार्टी’ खास बनली. रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, सलमान खान, शाहरुख खान आणि जान्हवी कपूर यांसारखे तारे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत पोहोचला होता. त्यानं अँटेलियाच्या खासगी प्रवेशद्वारातून प्रवेश करुन पापाराझींना टाळलं. या पार्टीत सलमानही उपस्थित होता. एंगेजमेंट बॅशमध्ये बराच वेळ दोघं उपस्थित होते. रात्री उशिरा शाहरुख आणि सलमान अँटेलियातून निघताना दिसले. दोघंही बराच वेळ पार्टीसाठी अँटेलियावर होते. जवळपास सर्व सेलिब्रिटींनी पार्टीतून परतल्यानंतर सर्वात शेवटी सलमान-शाहरुख बाहेर पडले. या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



