![]()
पंढरपूर लाईव्ह न्यूज:
छातीत रोखुनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
पंढरपूर, दिनांक 18/02/2026 रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी दास यांनी छत्रपतींच्या कार्याचा व विचारांचा आदर्श पुढे ठेवून आजच्या पिढीने आपल्या आचरणात उतरवणे हीच महाराजांना खरी मानवंदना ठरेल, असे विचार व्यक्त केले.
स्वराज्य, शौर्य, निष्ठा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारे छत्रपतींचे जीवन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध कलागुणांचे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातून छत्रपतींचे पराक्रम, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेले प्रेम प्रभावीपणे सांगण्यात आले.
नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर छत्रपतींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पराक्रमावर आधारित शिवपोवाडा, दमदार शिवगर्जना तसेच भाषणांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने वातावरण भारावून टाकले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंदांचा सहभाग होता. सर्वांच्या आयोजनामुळे कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलचा हा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

