Pandharpur Live News Online : आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता (Aashadhiwari) मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय अखेर जारी करण्यात आला आहे.
गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.
यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या यशस्वीतेसाठी योग्य नियोजन
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै रोजी होत असून 26 जून ते 10 जुलै 2025 हा संपूर्ण यात्रा कालावधी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या व अन्य पालख्यांचे त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे.
संपूर्ण वारी कालावधीत पालख्या, दिंड्या त्यांच्या समवेत असणारे वारकरी, भाविक यांना पालखी मार्ग, पालखी तळ, पालखी विसावा ठिकाण, रिंगण व पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सोयी सुविधा संबंधित प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत काटेकोरपणे उपलब्ध करून द्याव्यात त्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व ही आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या नियोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथून घेतला. याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले की, आषाढी वारी मध्ये सर्व मानांच्या पालख्या व अन्य पालख्या प्रमुख व विश्वस्त यांच्या सूचनेप्रमाणे पालखी मार्ग पालखी मुक्काम ठिकाण विसावा ठिकाणी व रिंगण व पंढरपूर शहरात वाखरी येथे आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यावर्षी पाऊस लवकर सुरू झालेला असून पावसाचे प्रमाण अधिक असू शकते त्या दृष्टीने पालखी मार्गावर, तळावर आवश्यक त्या ठिकाणी जलावरोधक मंडप उत्कृष्ट दर्जाचे टाकावेत. शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली करावी. पालखी सोहळा व वारकऱ्यांना या कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी दिलेली जबाबदारी अत्यंत नियोजनबद्धरित्या पार पाडावी. या सोयी सुविधा निर्माण करताना आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पुणे, सातारा व सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पालखी मार्गावर त्यांच्या त्यांच्या हद्दीत पालखी मुक्कामी ठिकाणी विसावा ठिकाणी जनरेटर ची व्यवस्था ठेवावी. कारण पाऊस लवकर सुरू झालेला आहे तसेच यावर्षी पाऊस अधिक प्रमाणात येण्याची शक्यता गृहीत धरून पालखी सोहळा प्रमुख व सोबतच्या दिंड्यांमध्ये येणारे वारकरी यांना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वीज नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने तेवढ्या प्रमाणात जनरेटर व्यवस्था करून ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले. यासाठी जिल्हा परिषदेचा सेस मधील निधी वापरावा. जर हा निधी नसेल तर जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.