सोलापूर; माचणूरहून बेगमपूर येथे सायकलवरून क्लाससाठी निघालेली विद्यार्थिनी सरंक्षण कठडा नसलेल्या भीमा नदी पुलावरून अचानक तोल जावून खाली पाण्यात पडली, परंतु तिचे धाडसी प्रयत्न व स्थानिक युवकांनी दाखविलेली तत्परता यामुळे ती सुखरुप बाहेर निघाली.
आकांक्षा नवनाथ सावंतराव (वय-१६, रा. माचणूर, ता.-मंगळवेढा) असे या धाडसी विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना आज रविवारी (दि.२१) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बेगमपूर माचणूर दरम्यान नदी पुलावर घडली.
अधिक माहितीनुसार, आकांक्षा ही सिद्धेश्वर विद्या मंदिर येथे दहावी इयत्तेत शिकत आहे. तिने बोर्ड परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर नुकताच दिला असून इंग्रजी विषयाचा दुसरा पेपर १ मार्चला आहे. मागील वर्षभरापासून ती बेगमपूर येथे एका खासगी शिकवणी वर्गाकरिता येते. आज इंग्रजी विषयाच्या शिकवणी वर्गासाठी ती सायकलवरून बेगमपूर येथे निघाली होती. उजनी धरणातून आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी सध्या दुथडी वाहत आहे.
दरम्यान पुलावर आल्यानंतर नदीतील पाण्याकडे पाहात असताना अचानक तिचा तोल जावून पाठीवरील दफ्तारासह सुमारे ३० ते ३५ फूट उंच पुलावरून खाली पाण्यात पडली. तिला थोडेफार पोहता येत असल्याने ती पोहता- पोहता न घाबरता मदतीसाठी हाक देवू लागली. याचवेळी गावातील नवनाथ हिरालाल धडे, उमेर इन्नुस इनामदार, सिद्धार्थ गणेश मान व संजय किसन भोई हे युवक अंघोळीकरीता नदीवर आले होते. सदर युवकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी जवळच असलेले मोटार गाडीचे ट्यूब तिच्या दिशेने फेकले. सदर ट्यूबचा तिने आधार घेतला व युवकांनी तिला ट्यूबसह पुढे नेत पाण्याबाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. निर्माण झालेल्या या जीवघेण्या प्रसंगातून सुखरूपपणे बाहेर आलेल्या लेकीला पाहत आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. दुथडी भरलेल्या नदी पात्रातील पाण्यातून बाहेर येण्यासाठी आकांक्षाने केलेले धाडसी प्रयत्न व युवकांनी मदतीसाठी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.