बेगमपूर : बेळगावहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलर बसचे मागील टायर फुटून बस उलटून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले तर अन्य दहा जणांना किरकोळ मार लागल्याची घटना मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी पावणे नऊ वाजणेचे सुमारास माचणूर (ता.मंगळवेढा) चौकात घडली.
जखमींना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद सिव्हिल पोलिसांत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर संग्राम वैभव भोपळे हा दोन वर्षांचा बालक चक्क रस्त्यावर फेकला गेला परंतु त्याला कोणतीही इजा न होता तो रस्त्यावरच आपल्या अपघातग्रस्त वाहनाकडे पहात उभारला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीला धावले.
शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमींची नावे अशी वाहन चालक बसवराज पाटील (वय ४०), सुधा भोपळे(वय ४५), प्रवीण पाटील (वय ३६) व शोभा पन्हाळकर (वय ५०)(सर्व रा. बेळगाव)
तर संजय भोपळे, (वय ५६) वैभव भोपळे (वय २८), अक्षता भोपळे(वय २५), वंश भोपळे, (वय ८ महिने) सारिका धुमाळ(वय १८), विकास धुमाळ (वय २२), गणपती पन्हाळकर (वय ५५), चन्नमा पन्हाळकर (वय ५०), टिनू सुतार (वय ५०), सुनीता सुतार (वय ४५), संग्राम भोपळे (वय २), अशी किरकोळ दुखापत झालेल्यांची नावे आहेत.
बेळगाव येथे स्वीट मार्टचे व्यावसायिक असलेले संजय भोपळे व जमखंडी येथील त्यांचे स्नेही पन्हाळकर असे कुटुंबातील चौदा जण बेळगावाहून (के.ए.-२४/७१२६) या खासगी ट्रॅव्हलरने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी रात्री दीड वाजणेचे सुमारास निघाले होते. दरम्यान रविवारी (ता. १६) माचणूर येथील वळण रस्त्यावर बसचे मागील चाकाचे टायर फुटल्याने सदर बस रस्त्यावर उलटली.
दरम्यान अर्जुन जाधव, अपलेश घुले, आमीर पटेल, नितीन शिवशरण, प्रताप वराडे, शकील शेख, डॉ. अक्षय प्रक्षाळे रस्ते सुरक्षा पथक कर्मचारी व ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशासह चालकाला त्यांनी बाहेर काढले. गंभीर झालेल्या चार चौघांना तातडीने महामार्ग रुग्ण वाहिकेतून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
अपघातात बस उलटल्यानंतर बसच्या टपावरील साहित्य रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडले. बसमधून बाहेर फेकला गेलेला दोन वर्षीय बालक संग्राम हा या साहित्यावरच पडला अन् काही क्षणातच तो उभा राहिला. तो अपघातग्रस्त वाहनाकडे पाहात उभा होता असे तेथील नागरिकांनी सांगितले.