बापानेच पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. बायकोसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात बापाने तीन महिन्याच्या मुलीला फरशीवर आपटत जीव घेतला.
मुंबईतील कुर्ल्यामध्ये शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत. ३६ वर्षीय आरोपी बापाचे नाव परवेज फकरूद्दीन सिद्धीकी असे आहे. २६ वर्षीय पत्नी सबा परवेज सिद्दीकी यांनी नवऱ्याविरोधात तक्रार दिली होती.
सबा आणि परवेज यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून सारखे खटके उडत होते. शनिवारी दोघांमध्ये टोकाचे भांडण झाल्या. त्यानंतर रागाच्या भरात परवेज याने तीन महिन्यांच्या मुलीला फरशीवर आपटून मारले. कुर्ला परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. सबा यांनी नवऱ्याच्या विरोधात विनोबा भावे नगर पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ परवेजला बेड्या ठोकल्या. कुर्ला येथील विनोबा भावे नगरमध्ये एलआयजी कॉलनी परिसरात सबा आणि परवेज राहत होते. दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वाद होत होता.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, परवेज सिद्दिकी कोणताही रोजगार करत नव्हता. त्यामुळे सबा आणि परवेज यांच्यामध्ये सतत खटके उडायचे. शनिवारी दुपारी सबा आणि परवेज यांच्याकडे कडाक्याचे भांडण झाले. सबाने परवेजला काम का करत नाही, असा जाब विचारला. पत्नीने जाब विचारल्यानंतर परवेजचा पारा चढला. परवेजने सबाला मारहाण केली. त्यावेळी सबाच्या कुशीत तीन महिन्याची चिमुकली होती
रागात असणाऱ्या परवेज याने सबा हिच्या कुशीतून चिमुकलीला घेतले अन् फरशीवर जोरदार आपटले. बापाच्या या हल्ल्यामध्ये तीन महिन्याची चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर आईने नवऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी परवेजला बेड्या ठोकल्या. विनोबा भावे नगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.