सोलापूर: कुंभारी टोल नाक्यावर टोलचे पैसे द्यायला थांबलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या एसटी बसने (एमएच १३, सीयु ७९०३) जोरात धडक दिली. या अपघातात बसमधील पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून वळसंग पोलिस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
सोलापूरहून अक्कलकोटच्या दिशेने जाणारी एसटी बस टोल नाक्यावर थांबलेल्या कंटेनरला धडकली. त्यानंतर तो कंटेनर पुढच्या टेम्पोला आणि टेम्पो बल्करला धडकला. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही, पण एसटी बसमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
काहींच्या नाकाला, डोक्याला, कपाळाला लागले असून त्यांना पोलिसांनी उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटलमध्ये) पाठविले आहे. टोल नाका काही फुटावर असताना देखील बस थांबली कशी नाही, बसगाडीचे ब्रेक लागले नाही की चालकाची काही चुकी आहे, याचा शोध वळसंग पोलिस रात्री उशिरापर्यंत घेत होते.