सोलापूर : हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्रालगत गॅरेजमध्ये थेट बल्कर घुसल्याने तीन जण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले.
शनिवारी (दि.15) सायंकाळी 6.15 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या आणि सोलापूरकडे येणाऱ्या दोन दुचाकींचा चक्काचूर होऊन दोघे जागीच ठार झाले, तर एक जण शासकीय रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच मरण पावला. या आपघातामूळे झेडपीवर शोककळा पसरली आहे . प्रशासनधिकारी कर्मचाऱ्यांचे नेते विवेक लिंगराज यांचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताचं अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ चाँदपाशा बागवान (वय ४५), तोहीद माजीद कुरेशी (वय २०, रा. सरवदेनगर, सोलापूर), विवेकानंद राजकुमार लिंगराज (वय ५५, रा. सतनाम चौक, लष्कर, सोलापूर) अशी अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेल्यांची नावे आहेत.
हैदराबाद रोडवर सायंकाळी नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ असताना अचानक हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या एम. एच. ४४ यू ७४९५ या बल्करचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि याचदरम्यान सोलापूरकडून हैदराबाद रोडकडे आपल्या स्कूटरने जाणाऱ्या विवेकानंद लिंगराज यांना पहिल्यांदा धडक दिली. याचदरम्यान, हैदराबाद रोडने दुचाकीवरून येणाऱ्यालाही उडवले. यात दोघे गंभीर जखमी होऊन मृत्यू पावल्याची माहिती समोर आली आहे. तर तोहीद कुरेशी हा त्याच्या तोहीद बॉडी बिल्डर या गॅरेजमध्ये ग्राहकांच्या वाहनांचे काम करीत असताना बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातस्थळी पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीला पांगवून तातडीने क्रेनच्या मदतीने गॅरेजमध्ये घुसलेला बल्कर काढला.
सुसाट बल्करच्या या अपघातात दुचाकीसह अन्य वाहने चक्काचूर झाली. काय घडतेय हे कळण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने एकच हलकल्लोळ उडाला. आरडाओरडा सुरू झाला. गॅरेजच्या बाजूला असलेल्या पंक्चरच्या दुकानात काम करणारा कामगारही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये वाजीद अलीम कुरेशी (वय ४९), माजीद महीबूब चौधरी (वय ३६, रा. दोघे सरवदेनगर, सोलापूर), करीम बादशहा बेपारी (वय २८, रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) यांच्यासह अन्य एक अशा चौघांचा समावेश आहे.
झेडपी प्रशासनधिकारी विवेक लिंगराज अपघाती निधन झाल्याचे कळताच सीईओ कुलदिप जंगम, डेप्यूटी सीईओ स्मीता पाटील, डिएचओ डॉ. संतोष नवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी सिव्हील हॉस्पीटमध्ये दाखल झाले. खासदार प्रणिती शिंदे आ.विजयकुमार देशमुखांची धाव
हैद्राबाद रोडवरील भीषण आपघाताची माहीती मिळताच खा. प्रणिती शिंदे,आ. विजयकुमार देशमूख यांनी सिव्हील हॉस्पीटल येथे जखमी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबियांशी संपर्क साधला .
या अपघातात जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिकारी विवेक ऊर्फ विवेकानंद लिंगराज यांचा बळी गेला. सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटना आणि विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध राखले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनात मिळेल ती जबाबदारी त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली. सोलापूरसह राज्यभरात कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचारी समस्यांची ते सोडवणूक करत असे. त्यांच्या आपघाती मृत्यूमूळे कर्मचाऱ्यां मध्ये न्याय हक्कासाठी लढणारा नेता हारपला असे म्हणत हळहळ व्यक्त करण्यात आला .