👁 3 Views

आई हळदी – कुंकवाला गेली तेव्हाच गळा घोटला , पोलिसाच्या मुलीचा घरात घुसुन मर्डर

आई हळदी – कुंकवाला गेली तेव्हाच गळा घोटला , पोलिसाच्या मुलीचा घरात घुसुन मर्डर

अमरावती: 26 वर्षांच्या संस्कृती राऊत हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अमरावती पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जिजाऊ नगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या संस्कृती संजय राऊत या 26 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह 28 जानेवारीच्या संध्याकाळी तिच्याच घरात सापडला होता.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला, पण अजूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

पोलिसांनी राऊत कुटुंबासह संस्कृतीच्या संपर्कात असलेल्या तिवस्याच्या एका तरुणाचीही पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. संस्कृतीला मोबाईलवर हाय मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचीही पोलिसांनी चौकशी केली, पण पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलं नाही, त्यामुळे संस्कृतीच्या हत्येचं गूढ 10 दिवसानंतरही कायम आहे.

संस्कृतीचे वडील संजय राऊत हे पोलीस कर्मचारी आहेत. 28 जानेवारीला संजय राऊत यांची मोठी मुलगी संस्कृती घरात एकटी होती. संस्कृतीची आई आणि छोटी बहीण परिसरामध्ये असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. दोघीही जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना संस्कृतीच्या खोलीमध्ये तिचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत मिळाला. ओढणीच्या सहाय्याने संस्कृतीचा गळा घोटण्यात आला होता, तसंच तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तही बाहेर आलं होतं.

राऊत कुटुंबाला संस्कृतीचा मृतदेह पाहताच धक्का बसला, यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं. सुरूवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, पण घटनेच्या तीन दिवसानंतर डॉक्टरांनी संस्कृतीचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना दिला. यात श्वास कोंडल्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. तसंच मृत्यूआधी संस्कृतीची कुणासोबत तरी झटापट झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. यानंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन संस्कृतीच्या कुटुंबासोबत चर्चा केली. यानंतर गाडगेनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

मागच्या वर्षी खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकोली स्मशानभूमीजवळ भुगावमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा शिर कापलेला मृतदेह सापडला होता. ही हत्या करणाऱ्यापर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी खूपच कठीण होतं, पण त्यांनी 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. पण 10 दिवसानंतरही संस्कृतीच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *