👁 4 Views

धक्कादायक! तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

धक्कादायक! तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

पुणे: सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पुण्यातील दोन पर्यटक शनिवारी सायंकाळी तोरणा किल्यावर गेले होते.

मात्र, त्यापैकी रणजित शिंदे यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांच्या सोबतीने असलेल्या मित्रांनी त्यांना मंदिरात नेले, परंतु तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर त्यांच्या सोबतीच्या व्यक्तीने पोलिस आणि रेस्क्यू टीमला संपर्क केला. एस.एल. ॲडव्हेंचर टीमचे सदस्य आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रेस्क्यू एक्सपर्ट लहू दादा आणि त्यांचे सहकारी खानापूरहून आवश्यक बचावसाहित्य (रोप, स्ट्रेचर, हेड टोर्च) घेऊन पाबे घाट मार्गे घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान, शिवापूरहून कौस्तुभ आणि त्यांचे सहकारी प्रशांत इंगुलकर, ऋषिकेश इंगुलकर आणि सचिन शेलार यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. ते सर्वजण तोरण्याच्या बेसला पोहोचले आणि पोलिस अधिकारी युवराज सोमण यांच्याशी चर्चा करून गड चढण्यास सुरुवात केली.

गडाच्या महादरवाज्याजवळ पोहोचल्यावर स्थानिक गावकरी आणि तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार्थिव खाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, हा मार्ग अत्यंत कठीण असल्याने त्यांना मदतीची गरज होती.

रेस्क्यू टीमने रोपच्या मदतीने स्ट्रेचर व्यवस्थित बांधले आणि पार्थिव हलू नये म्हणून योग्य ते उपाय केले. ऋषिकेश, प्रशांत आणि गावातील अन्य सदस्यांनी समोरील बाजू तर लहू दादा, सचिन शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील बाजू सांभाळत गडाचा कठीण टप्पा पार केला.

सुमारे ८० ते ८५ किलो वजनाचे पार्थिव अशा दुर्गम ठिकाणाहून खाली आणण्यासाठी प्रचंड मेहनत, कौशल्य आणि टीम वर्क आवश्यक होते. मोठ्या धाडसाने रेस्क्यू टीमने ही जबाबदारी पार पाडली. अखेर सकाळी ४ वाजता पार्थिव बेसला पोहोचवण्यात आले आणि अँब्युलन्स व डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आले.

यानंतर सर्व रेस्क्यू सदस्य आणि पोलिस वेल्हे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरताना योग्य तयारी, वैद्यकीय स्थितीची काळजी आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.

“एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य संपून जाते. आपल्या घरी आपले कुटुंबीय वाट पाहत असतात. सह्याद्रीत भटकंती करताना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात,” असे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *