👁 2 Views

सांगली: जेवण उशिरा केल्यामुळे साथीदार कामगाराचा खून

सांगली: जेवण उशिरा केल्यामुळे साथीदार कामगाराचा खून

कुपवाड: जेवण उशिरा का केलेस, चपाती कच्ची केली आहेस, या कारणातून दोघांनी दांडके डोक्यात मारून साथीदार कामगाराचा निर्घृण खून केला. ही घटना कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात मंगळवारी मध्यरात्री घडली.

इद्रिस गौरीशंकर यादव (वय 23, मूळ गाव साहुपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. कुपवाड एमआयडीसी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित वैभव सहदेव कांबळे (21) व चिदानंद ऊर्फ संतोष मायाप्पा खोत (22, दोघेही मूळ रा. सलगरे, ता. मिरज, सध्या रा. कानडवाडी, ता. मिरज) या दोघांना कुपवाड पोलिसांनी अटक केली.

घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी : औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यालगत पेट्रोलपंपासमोरील औषध विक्री करणार्‍या कंपनीच्या गोदामात फॅब्रिकेशनचे काम पंधरा दिवसांपासून सुरू आहे. इद्रिस हा तरुण काही दिवसांपासून संशयित वैभव व चिदानंद यांच्याबरोबर काम करीत होता. तिघेही कामगार कंपनीतील खोलीत राहत होते. मंगळवार, दि. 28 रोजी नेहमीप्रमाणे तिघेही कामगार काम करीत होते. रात्री इद्रिसने जेवण बनविण्यास उशीर केला, तसेच चपात्या कच्च्या केल्या, म्हणून संशयित वैभव व चिदानंद यांनी त्याच्या डोक्यात लाकडी दांडके मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर, उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी खुनाची कबुली दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनीही घटनास्थळी भेट दिली.

इद्रिस यादवचा मृतदेह रात्रभर खोलीतच होता. संशयित दुसर्‍या खोलीत झोपले होते. सकाळी त्यांनी घडलेली घटना ठेकेदाराला सांगितली. ठेकेदाराने तातडीने याची माहिती कुपवाड पोलिसांना दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *