👁 3 Views

सांगली; उसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने तरूणाचा मृत्यू

सांगली; उसाची ट्रॉली अंगावरून गेल्याने तरूणाचा मृत्यू

सांगली: कर्नाळ (ता. मिरज) येथे शाळेतून मुलींना घरी घेऊन रस्त्याने चालत निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचा जॉईंट तुटून दोन्ही ट्रॉल्या वेगळ्या झाल्या.

यातील मागील ट्रॉली तरुण व मुलींच्या दिशेने आली. तरुणाने क्षणाचाही विलंब न लावता मुलींना ढकलून देत त्यांना वाचविले. पण उसाची ट्रॉली या तरुणाच्या मात्र अंगावरून गेली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अभिजित निवृत्ती पाटील (वय 42, रा. कर्नाळ) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजित पाटील हे कुटुंबीयांसह कर्नाळमध्ये राहत होते. बुधवारी सायंकाळी ते मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले. शाळेतून त्यांची मुलगी आणि तिच्या दोन मैत्रिणींना घेऊन ते चालत घरी निघाले होते. त्यांच्या बाजूनेच आणखी एक लहान मुलगी चालत जात होती. यावेळी कर्नाळहून सांगली रस्त्यावरील मगदूम वस्तीजवळ ते येताच एक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरून निघाला होता. यावेळी दोन्ही ट्रॉल्यांमधील जॉईन्ट तुटला आणि एक ट्रॉली ट्रॅक्टरसोबत पुढे गेली, तर मागील ट्रॉली अभिजित व मुलींच्या दिशेने आली. प्रसंगावधान राखून अभिजित यांनी मुलींना बाजूला ढकलून दिले अन् त्याचवेळी ट्रॉलीचे चाक अभिजित यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी सोबतच्या चारही मुलींना वाचविले, परंतु स्वतःचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले नाही. मुलीचे दप्तर, डब्याची पिशवी अभिजित यांच्या हातातच होती. अपघातस्थळी हृदयद्रावक दृश्य होते. ते पाहून ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत होते. अभिजित यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *