विटा: भांडणाचा राग मनात धरून धावत्या मोटारीतून बाहेर ओढून, तलवारीने सपासप वार करून पैलवानाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार कार्वे (ता. खानापूर) येथे बुधवारी (दि. 15) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला.
राहुल गणपती जाधव (वय 35, रा. कार्वे) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी मृत राहुल यांचे भाऊ राजाराम जाधव यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून माणिक संभाजी परीट (38), गजानन गोपीनाथ शिंदे (46, दोघे रा. मंगरूळ, ता. खानापूर), अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी (27), प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव व नितीन पांडुरंग जाधव (सर्व रा. कार्वे) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील माणिक परीट, गजानन शिंदे व नयन धाबी या तिघांना अटक केली असून, अन्य हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राहुल जाधव यांचे विटा एमआयडीसीमध्ये कार्वे हद्दीत हॉटेल आणि बार आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर मध्यरात्री त्यांचे भाऊ राजाराम यांना हॉटेल व्यवस्थापक भारत भोसले यांचा फोन आला. त्याने ‘राहुल यांचा घातपात झाला असून, ताबडतोब मंगळूर रस्त्यालगतच्या हॉटेलवर या’, असे सांगितले. राजाराम तातडीने घटनास्थळी पोहोचले. भारत भोसले व राहुल यांचे मित्र सौरभ साठे, विशाल काळभागे होते. त्यांना कार्वे ते तासगाव जाणार्या रस्त्यालगत, कार्वे हद्दीतील स्मशानभूमीसमोर पुलावर राहुल यांचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांच्या डोक्यावर पाठीमागील बाजूस वार केले होते.
विशाल काळभागे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते आणि त्यांचे इतर मित्र राहुल यांच्या हॉटेलवर गेले. तेथून मोटारीतून (एमएच 10 डीएल 4265) राहुल यांच्यासह ते मंगरूळ रस्त्याकडेच्या दुसर्या हॉटेलवर गेले. तिथे संशयित माणिक परीट, गजानन शिंदे, अमृत माळी, नयन धाबी व राहुल जाधव यांच्यात काही कारणाने भांडण सुरू झाले. त्यावेळी तेथे संशयित प्रफुल्ल कांबळे, रोहन जाधव, नितीन जाधव हेही आले. वादानंतर राहुल मित्रांसमवेत मोटारीतून बाहेर पडले. विटा-तासगाव रस्त्यावरील स्मशानभूमीसमोरील पुलाजवळ हल्लेखोरांनी त्यांना रोखले. राहुल यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. यावेळी राहुल मोटार चालवित होते. हल्लेखोरांनी धावत्या मोटारीतून खाली ओढून त्यांच्यावर तलवार, गुप्तीसारख्या शस्त्रांनी सपासप वार केले. हॉकी स्टीकने मारहाण केली. तसेच डोक्याच्या मागच्या बाजूला वार केले. मोटारीत राहुल यांच्यासोबत असलेल्या काळबागे यांनाही मारहाण करून जखमी केले.
याबाबत राजाराम जाधव यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एकूण सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य चौघांचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विपूल पाटील, निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनीही घटनास्थळी भेट देेऊन तपासाच्यादृष्टीने अधिकार्यांना सूचना केल्या. उपनिरीक्षक व्ही. जी. येळेकर अधिक तपास करत आहेत.


