
लाडकी डकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अर्जांची छाननी होणार आहे. ज्या लाभार्थीबाबत तक्रारी आल्या आहेत. त्या लाभार्थी महिलांचे अर्ज तपासून बाद केले जाणार आहेत.’, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची पडताळणी करण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
कोणत्या अर्जांची पडताळणी होणार?
सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, “तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील. तसेच कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही अपात्र ठरतील. या दोन प्रमुख अटींशिवाय आंतरराज्य विवाह केलेल्या महिलाही या योजनेस पात्र ठरणार नाहीत, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्याशिवाय आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरतील, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.
या महिलांना मिळतोय लाडक्या बहीण योजनेचा लाभ –
– ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
– ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो, अशा महिलांनादेखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही.
– ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे, अशा महिलादेखील या योजनेसाठी पात्र नाहीत.
– ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहे त्यादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.