👁 6 Views

पत्नीच्या पोटात चाकूने वार करून गळ्याला दोरीने फास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

दारुच्या नशेत पत्नीच्या गळ्यात दोरी आवळून तिच्या पोटात चाकूने सपासप वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार वारजे येथे घडला.


सुदैवाने पत्नीने आरडा ओरडा केल्याने मुलाने दरवाजा उघडला व चाळीतील लोकांनी धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. 

याप्रकरणी वारजे पोलिसांनी दारुडा पती हेमंत मधुकर सोनवणे (वय ३७, रा. विठ्ठलनगर, वारजे) याला अटक केली आहे. हा घटना गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडली.


याप्रकरणी प्रियांका हेमंत सोनवणे (वय २६) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २६/२३) दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पती व दोन मुलांसह वारजे येथे राहतात. त्यांची सासू त्यांच्याकडे येऊन जात असते. पतीपत्नीत घरातील किरकोळ कारणावरुन वाद होत होते. आजारी असल्याने गुरुवारी रात्री फिर्यादी या झोपून होत्या. हेमंत फिर्यादींना म्हणाला, माझे अंग दुखत आहे व मला दारु पिल्याशिवाय झोप येत नाही. तो अतुलनगर येथे जाऊन दारु घेऊन आला. येताना दारुची बाटली, एक चाकू व प्लास्टिकची दोरी त्याने खिशात लपवून आणल्या. त्याने घरातच दारु पिली. त्यानंतर तो फिर्यादीला म्हणाला, दुपारी तू माझी आई, बहिण का काढलीस व माझ्याशी का भांडलीस, असे म्हणत रागाच्या भरात त्याने खिशातील दोरी काढली. फिर्यादीच्या गळ्याला पूर्णपणे गुंडाळली व दोरी आवळू लागला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने आणखी दोरी आवळली.


तेव्हा त्यांच्या गळ्याला कापले व त्यातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात ती दोरी तुटल्याने फिर्यादी यांनी आणखी विरोध करु लागल्या. त्याने पँटच्या मागील खिशामध्ये ठेवलेला चाकू काढला व त्याने फिर्यादीला धमकावले. तू कोणाला काही सांगू नकोस नाही तर या चाकूने तुला मारीन, असे म्हणून त्याने फिर्यादींच्या पोटात ठिकठिकाणी सपासप भोसकले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. तेव्हा त्यांची दोन्ही मुले उठली व ते दोघेही आरडाओरडा करु लागली. मोठ्या मुलाने घराचा दरवाजा उघडला. त्यांचा आरडाओरडा ऐकून चाळीतील लोक जमा झाले. त्याने फिर्यादीच्या पाठीत आणखी एक वार केला. तेव्हा लोकांनी त्याला पकडले.
फिर्यादी यांना प्रथम माई मंगेशकर हॉस्पिटल व तेथून ससून रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी पती हेमंत सोनवणे याला अटक केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *