पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरीतील चौफाळ्यात दि.28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एक पाच वर्षाची मुलगी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांना रडताना आढळून आली. सदर मुलगी कन्नड बोलत होती. ती काय बोलतेय हे कळत नव्हते, मोठमोठ्याने चालु असणार तिचं रडणं कांही केल्या थांबत नव्हतं. अंकुशराव यांनी तत्परतेने कन्नड भाषिक शोधून काढत या मुलीशी त्यांचा संवाद घडवून आणला. तिची अधिक चौकशी केली असता ती तिच्या आजी आजोबासोबत विठ्ठलाचे दर्शन घेऊन चौफाळ्यातून जाताना नकळत चौफाळ्यात एकटीच मागे राहिली असल्याचे समजले. तिला कन्नडमधून ‘‘तू यांच्यासोबत जा! हे तुला तुझ्या आजी-आजोबांकडं सोडतील.’’ असं त्या कन्नड भाषिकानं सांगितल्यावर सदर मुलगी कांही वेळ शांत झाली. यानंतर महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी सदर मुलीच्या आजी आजोबांना पंढरीत वारकरी जिथं जिथं थांबतात अशी सारी मठं व वाडे पालथे घातले व अखेर सदर मुलीला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिच्या पालकांचा शोध घेवून त्यांच्याकडे सुपूर्त केले.
सदर मुलगी ही निपाणी येथील होती. पंढरीत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आई-वडील व आजी-आजोबांसोबत ती आलेली होती. दर्शनासाठी तिला आजी-आजोबा सोबत घेवून गेले होते. परंतु दर्शनाहून परतताना चौफाळ्यात ती मागे राहिली. महर्षी वाल्मिकी संघाने पंढरीत खुप शोधल्यानंतर सदर मुलीचे पालक हे इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळील बडवेच्या वाड्यामध्ये आढळून आले. आपली मुलगी सोबतच्याच कुणाकडे तरी असेल असे वाटल्याने ते आपली मुलगी हरवलीय याबाबत अनभिज्ञ होते. मुलीला त्यांच्या स्वाधीन करुन ‘‘ही चौफाळ्यात हरवली होती.’’ असे सांगताच सदर मुलीचे आजी आजोबा व पालकांना गहिवरुन आले. ‘‘कोणत्या शब्दात तुमचे आभार मानायचे? तुमच्या रुपात पांडुरंगानेच आमची मुलगी आम्हाला परत केली.’’ अशा शब्दात त्यांनी महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. सदर मुलीला सुखरुपरित्या तिच्या पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर महर्षी वाल्मिकी संघातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मोकळा श्वास घेतला. आपण आज एक चांगले काम केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्यावर ठळकपणे दिसून येत होते.
कित्येकदा पंढरपूरमध्ये विठोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांपैकी वयस्कर भाविक किंवा लहान मुलं रस्ता चुकतात, भटकतात यापैकी लहान मुलं जर असतील तर अशी मुलं सुखरुप व सुरक्षीतरित्या आपल्या पालकांपर्यंत पोहचतीलच याची शाश्वती देता येत नाही. कारण एकटी-दुकटी मुलं पाहून त्यांना पळविण्याची शक्यता असते. ही खुप गंभीर बाब आहे. त्यामुळं भाविकांनी आपल्या सोबतच्या मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे. आज आम्हाला मिळून आलेली मुलगी अमराठी होती, वयाने अतिशय लहान होती. सदर मुलगी जर एखाद्या अपप्रवृतीच्या हाती लागली असती तर…? असा प्रश्न उपस्थित करुन गणेश अंकुशराव यांनी सदर मुलगी आम्हाला मिळून येणं व तिचे पालक लवकर मिळून येणं ही सर्व श्रीविठ्ठलाचीच कृपा आहे. व त्यानंच आमच्या हातून हे सर्व कांही करवून घेतलं असल्याची भावना एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे यांनी व्यक्त केली आहे.
सदर मुलीचा शोध घेण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






