👁 8 Views

मला पंढरपूरची प्रेरणा व्हायचंय् : वीरपत्नी उमादेवी गोसावी

पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017
पंढरपूर : माझे पती कुणाल यांना शत्रुशी लढताना वीरगती प्राप्त झाली. त्याचा अभिमान उरात बाळगून पंढरपूरकरांनी आज त्यांचे जे स्मरण केले आहे, हे खरोखरच मला प्रेरणादायी ठरले आहे. मलाही कुणालच्या स्मरणार्थ कार्य करावयाचे आहे. लोकांचे प्रेरणास्थान बनायचे आहे. पंढरपूरकरांनी माझ्या या कार्यात मला असेच सहकार्य द्यावे, असे भावपूर्ण उद्गार वीरपत्नी उमादेवी गोसावी यांनी अभिवादन पत्र स्विकारल्यानंतर बोलताना काढले.
पंढरपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोपाळकृष्ण मंदिराजवळ आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात वीरपत्नी उमादेवी यांना भारतमातेचे अखंड भारताच्या नकाशातील कुणाल गोसावी यांचे छायाचित्र व या वीर पुत्राला मानवंदना म्हणून शब्दसुमनांनी वाहिलेले अभिवादन अर्पण करण्यात आले.  त्यावेळी त्या बोलत होत्या.
पंढरपूरकरांनी कुणाल गोसावी यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून केलेला प्रयत्न पाहून त्यांना समाधानही वाटत होते व पतीच्या आठवणीने त्या गहिवरूनही गेल्याचे दिसत होते. परंतु त्या वीरपत्नी असल्याने त्यांनी आपली भावुकता प्रकट न करता प्रखरपणाने या समाजासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्यांनी आपल्या भाषणातून मन मोकळे केले. त्या म्हणाल्या की, कुणाल किती मोठा होता, हे आज मला लक्षात आले. त्याला वीरमरण प्राप्त झाले. देशासाठी लढता लढता त्यांनी प्राणाची आहुती दिली. त्याचे हे मरण मी प्रेरणास्थानी मानून पंढरपूरच्या तरूण-तरूणींमध्ये राष्ट्राभिमानी जागृत करणारे कार्य यापुढे मला करायचे आहे. त्यासाठी मला आपणा सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती करून पुन्हा त्या म्हणाल्या की, मला राष्ट्र समर्पित पिढी घडविण्यासाठी पंढरपूरकरांची प्रेरणा व्हायचंय्, पंढरपूरचे नाव महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचे आहे.
ज्याच्या वीर मरणाने पंढरपूरचे नाव देशात गेले, त्याच्याच कार्याचा वसा पुढे चालवून पंढरपुरातील तरूण पिढी राष्ट्रभक्तीने प्रेरीत झालेली मला पहायची आहे. आणि त्याकरीताच कार्य करावयाचे आहे. आजचा लोकांचा उत्साह पाहून हे कार्य मी करू शकेन, असा विश्वास मला निर्माण झाला आहे. त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आणि वीरपत्नीचे मनोगत काय असू शकते, याचे दर्शन पंढरपूरकरांना घडविले. त्यांचे हे मनोगत उपस्थितांना प्रेरणादायीच ठरले.
29 नोव्हेंबर हा दिवस यापुढे पंढरपुरात शौर्यदिन म्हणून पाळला जाणार, या वाक्याचा धागा पकडत नगराध्यक्षा साधना भोसले यांनी आपल्या मनोगतात खरोखरच आजचा दिवस हा शौर्यदिन आहे. केवळ शौर्यदिन न पाळता यासाठी नगरपालिकेची सर्वतोपरी मदत घेऊन या दिनाचे औचित्य साधत पंढरपूरमधील युवकांना शौर्याचे धडे देणारा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. या कार्यक्रमासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपण पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने पुरवू. परंतु केवळ कुणालची आठवण ठेऊन हा दिवस न पाळता यापुढील काळात शौर्यदिनाच्या दिवशी प्रशिक्षण चालविले जावे, अशी अपेक्षा पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी आपल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केली.
या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष जम्मूचे विकास मनहास हे नागरिक उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या मनोगतात अतिशय मोजक्या शब्दात कुणालबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. यापुढे पंढरपूर हे जसे विठ्ठलाच्या नावाने परिचित आहे, तसेच शौर्याच्या बाबतीत पंढरपूर हे कुणाल गोसावी यांच्याही नावाने प्रसिद्ध झालेले आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेली मंडळी पुढे 50 ते 60 वर्षे राहू शकतील. मात्र कुणाल गोसावी यांचे नाव त्यांच्या केलेल्या कार्याने इतिहासात अजरामर राहणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठला सोबतच कुणाल गोसावी हे पंढरपूरचे होते, असे सर्वत्र गणले जाणार आहे.
पंढरपूरच्या कुणाल गोसावींनी आमच्या जम्मूच्या सीमेवर आमच्या रक्षणार्थ जो लढा दिला तो अविस्मरणीय असा आहे. आम्ही त्यांचे हे कार्य, त्यांचा लढा कधीही विसरू शकणार नाही. त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून मी आज खास जम्मूहून येथे आलो आहे, अशा शब्दात जम्मूचे विकास मनहास यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विकास मनहास हे स्वत: भारत मातेच्या रक्षणार्थ सेवा बजावत असताना शहीद झालेल्या वीरपत्नींच्या कुटुंबाचे एकत्रिकरण करून त्यांना अनेक योजना व सहकार्य करणार्‍या मंडळाचे अध्यक्ष आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आदिती महाजन-बडवे यांनी केले. कार्यक्रमामध्ये शहीद कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमादेवी गोसावी यांना दिलेल्या अभिवादन पत्राचे वाचन व वंदे मातरम् हे देशभक्तीपर गीत प्रा. गौरी अंमळनेरकर यांनी सादर केले. प्रास्ताविक भाजपाचे शहर सरचिटणीस संजय वाईकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर भाजपाच्या नगरसेविका शकुंतला नडगिरे, उपनगराध्यक्षा सुजाता बडवे, सुप्रिया वाईकर आदी उपस्थित होत्या.
संपूर्ण रॅलीच्या मार्गावर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अपर्णा तारके, पूजा बोरामणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला कार्यकर्त्यांनी रांगोळी काढली होती. या कार्यक्रमासाठी भाजपाच्या आजी-माजी पदाधिकारी, युवा मोर्चा व विविध आघाड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.



भाजपाच्या स्वाभिमान रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जम्मू काश्मिरच्या नगरोटा येथे अतिरेक्यांशी लढत असताना वीर मरण प्राप्त झालेले पंढरपूरचे सुपूत्र कुणाल गोसावी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमान (अभिवादन) रॅलीला पंढरपूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यापासून बरोबर सकाळी 8 वा. रॅलीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ही रॅली स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुढे ही रॅली गोपाळकृष्ण मंदिरापासून गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, तांबडा मारूती, महाद्वार चौक, विजापूर गल्ली, कालिकादेवी मंदिर मार्गे काळा मारूतीजवळून चौफाळ्यामध्ये आली. याठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या खास व्यासपीठावर अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये झाला. हा सारा परिसर ‘कुणाल गोसावी अमर रहे’च्या घोषणांनी दणाणून गेला होता.
रॅलीमध्ये ‘देश का बेटा कैसे हो, मेजर कुणाल जैसा हो!’, ‘अमर रहे, अमर रहे, मेजर कुणाल अमर रहे!’ ‘जब तक सूरज चाँद रहेगा, कुणाल तेरा नाम रहेगा!’ ‘कौन कहता है कुणाल हमसे दूर है, वो तो हमारा कोहिनूर है!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. पंढरपूर शहरातील बहुतांशी शाळा या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये आदर्श बाल व प्राथमिक विद्यामंदिर, नगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा नं. 16, लोटस् इंग्लिश स्कूल, गौतम विद्यालय, महिला मंडळ, ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक विद्यालय, कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय, कवठेकर प्रशाला, विवेक वर्धिनी विद्यालय, मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा यासह अनेक शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ही अभिवादन रॅली शहरातून जात असताना रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून रॅलीचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनीही अनेक ठिकाणी दुतर्फा उभे राहून रॅलीचे स्वागत केले. सकाळी 8 ते 10 या दोन तासाच्या वेळेमध्ये संपूर्ण पंढरपूर कुणालच्या आठवणीने भावुक झाले होते. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी कुणाल गोसावी अतिरेक्यांशी लढताना धारातिर्थ पडला होता. पंढरपूरच्या या सुपूत्राची आठवण भाजपाच्या या रॅलीमध्ये पुन्हा एकदा जागृत झाली व सारे पंढरपूरकर या आठवणीने भावुक झाले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *