पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर शहर संघटकपदी सागर बबन तारापूरकर, रा. कोळे गल्ली, पंढरपूर यांची निवड नुकतीच करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे सोलापूर शहर संघटक दिलीप धोत्रे व मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या शुभहस्ते नुकतेच सागर तारापूरकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. सागर तारापूरकर यांची पंढरपूर शहर संघटकपदी निवड झाल्याबद्दल महर्षी वाल्मिकी संघ, मातोश्री प्रतिष्ठान, नवचैतन्य मित्र मंडळ व मित्रपरिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सागर तारापूरकर हे गेल्या अनेक वर्षापासून पंढरीतील सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते स्वत: प्राणीमित्र असून त्यांनी आजपर्यंत डॉग रेस, डॉग शो, कबुतर स्पर्धा आदींचं आयोजन पंढरीत सर्वप्रथम केलेले आहे. याबरोबरच क्रिकेट टुर्नामेंटस्, कॅरम स्पर्धा आदी स्पर्धा भरवून युवकांना प्रेरणादायी देणाचं कार्य केलेलं आहे. समाजकार्याची त्यांना असलेली आवड व समाजात मिसळून सर्वसामान्यांंशी संवाद साधून त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेलं समाजकार्य याची दखल घेवून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांच्या व मनसेच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांच्या आदेशानुसार मनसेचं संघटन वाढविण्यासाठी व मनसेमार्फत युवकांचे व वंचित शोषीत घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी माहिती सागर तारापूरकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.