पंढरपूर Live 1 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांचा शेतीपंपासाठीचा वीज पुरवठा आज दि. 1 डिसेंबरपासून खंडीत करणार असल्याचे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले होते. यामुळे शेतकर्यांची उभी पिके जळून मोठे नुकसान होणार होते. आधीच प्रतिकुल परिस्थितीशी झगडून कसेबसे सावरणारे शेतकरी बांधव वीज खंडीत होणार असल्याचे समजल्यानंतर पुरते भांबावून गेले होते. बळीराजाला दिलासा मिळावा व सदर बंद होणारा वीजपुरवठा सुरळीत सुरु रहावा यासाठी युवक काँग्रेस च्या वतीने आज दि. 1 डिसेंबर रोजी अनवली, ता. पंढरपूर येथे पंढरपूर मंगळवेढा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या अधिकार्यांकडून ‘वीजपुरवठा खंडीत करणार नसल्याचे लेखी पत्र मिळाल्यानंतर’ हे आंदोलन मागे घेण्यात आले.
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील असंख्य शेतकरी व युवक काँग्रेसचे तालुक्यातील कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘वीज पुरवठा खंडीत करणार नाही.’ असे महावितरणच्या सक्षम अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. तब्बल अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे पंढरपूरकडील गोपाळपूरपर्यंत व मंगळवेढ्याकडील एकलासपूरपर्यंत वाहतुक खोळंबलेली होती. पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे व तालुका पोलिस निरीक्षक के.के. खराडे यांनी महावितरणच्या अधिकार्यांना या आंदोलनाची तीव्रता निदर्शनास आणून दिली. व हे आंदोलन त्वरीत थांबवण्यासाठी प्रयत्न करा! असे सुचीत केल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप सानप हे आंदोलनस्थळी आले. पंढरपूर तालुक्यातील शेती पंपांचा वीजपुरवठा तोडणार नाही! असे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. लेखी पत्रानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पंढरपूर तालुका युवक काँग्रेसच्या या रास्ता रोको आंदोलनात संतोष पाटील, पिंटु भोसले, दिलीप जाधव, कल्याण घुले, आबा शिंदे, मनोज ठेंगील, राजाराम गायकवाड, विठ्ठल मोरे आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पिंगळे साहेबांनी सुनावले खडे बोल… अधिकारी संदीप सानप लुंगीवर हजर! या आंदोलनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील वाहतुक तब्बल अडीच तास खोळंबलेली होती. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन नागणे यांनी ‘‘जोपर्यंत महावितरणचे सक्षम अधिकारी लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही!’’ असा पवित्रा घेतला होता. महावितरणचे पंढरपूर तालुका उपकार्यकारी अभियंता हेमंत कासार मात्र आंदोलनाच्या ठिकाणी फिरकलेच नव्हते. अखेर पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांनी महावितरणच्या अधिकार्यांना खडे बोल सुनावले. यानंतर मात्र महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप सानप हे स्वत: चक्क लुंगीवरच आंदोलनस्थळी हजर झाले व लेखी आश्वासन दिले. हे आंदोलन थांबविण्यासाठी महावितरणचे उपअभियंता हेमंत कासार उपस्थित राहिले नसल्यामुळे महावितरणचे अधिक्षक अभियंत्यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.