👁 6 Views

हिटरमधून बसला विजेचा धक्का , पती – पत्नीचा जागीच मृत्यू

 

तालुक्यातील पिंपळगाव (घोळवे )येथील पती, पत्नीचा पाणी तापविण्याच्या हिटरमधून बसलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.


ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (50) आणि इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (45) अशी मृतांची नावे आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे हे पत्नी इंदूबाई आणि आईसह पिंपळगाव येथे राहतात. आज पहाटे 4 वाजता झोपेतून उठल्यानंतर इंदुबाई या हिटर लावण्यासाठी पाण्याने भरलेली बकेट घेऊन विजेच्या बोर्डाकडे गेल्या.

 हिटर लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. हे लक्षात येताच ज्ञानेश्वर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दोघा पती, पत्नीचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मृतांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई आहेत. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *